लेख – रशियाची अणुऊर्जेवर चालणारी क्षेपणास्त्र – नवे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन  [email protected]

रशियाने विकसित केलेले बुरेव्हेस्टनिक हे केवळ एक क्षेपणास्त्र नाही. ते आधुनिक युद्धतंत्रातील एका धोकादायक वळणाचे प्रतीक आहे. अमर्यादित रेंज, अनपेक्षित मार्ग आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामुळे ते सामरिकदृष्टय़ा आकर्षक वाटू शकते, परंतु त्यासाठी मोजावी लागणारी किंमत म्हणजे किरणोत्सर्गी प्रदूषण, पर्यावरणीय हानी आणि जागतिक असुरक्षितता. तांत्रिक प्रगती आणि नैतिक जबाबदारी यांच्यातील संतुलन हरवले तर विज्ञान मानवतेच्या सेवकाऐवजी तिच्या विनाशाचे साधन बनू शकते. म्हणूनच बुरेव्हेस्टनिकचा प्रश्न हा केवळ रशियाचा किंवा लष्करी तंत्रज्ञानाचा प्रश्न नाही, तर तो संपूर्ण मानवजातीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.

आज जग एका अत्यंत अस्थिर आणि धोकादायक टप्प्यातून जात आहे. युव्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील संघर्ष, आफ्रिकेतील गृहयुद्धे, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, सायबर युद्ध, माहिती युद्ध आणि ड्रोन युद्ध अशा विविध स्वरूपातील 40 ते 50 संघर्ष जगभर सुरू आहेत. या संघर्षांमुळे अनेक देशांची भूमी नव्या शस्त्रास्त्रांच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा बनली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे युद्धाचे स्वरूप झपाटय़ाने बदलत असताना काही राष्ट्रे अशी शस्त्रs विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जी केवळ शत्रूसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकतात. यामध्ये रशियाने विकसित केलेले अणुऊर्जेवर चालणारे ‘बुरेव्हेस्टनिक’ (Burevestnik) किंवा नाटोच्या भाषेत ‘स्कायफॉल’ (Skyfall) हे क्रूझ क्षेपणास्त्र विशेष चिंतेचा विषय बनले आहे. हे शस्त्र आधुनिक युद्धतंत्रातील एक क्रांतिकारी, पण अत्यंत वादग्रस्त प्रयोग मानले जात आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2018 मध्ये जगासमोर सहा नव्या ‘सुपर शस्त्रां’ची घोषणा केली होती. त्यामध्ये बुरेव्हेस्टनिक हे सर्वाधिक चर्चेत राहिले. अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात ‘प्रोजेक्ट प्लुटो’ नावाने अशाच प्रकारच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रावर संशोधन केले होते. मात्र पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन अमेरिकेने हा प्रकल्प रद्द केला. रशियाने मात्र हा विचार पुन्हा उचलला. अमेरिकेने 2002 मध्ये Anti-Ballistic Missile Treaty मधून बाहेर पडल्यावर रशियाला अशी शस्त्रs विकसित करण्याची गरज वाटू लागली, जी अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला चकवा देऊ शकतील. बुरेव्हेस्टनिक हा त्याच प्रयत्नांचा परिणाम आहे. अणुभट्टीवर चालणारे क्षेपणास्त्र म्हणजे काय? सामान्य क्षेपणास्त्रs रॉकेट इंधन किंवा जेट इंधनावर चालतात. त्यामुळे त्यांची रेंज मर्यादित असते. मात्र बुरेव्हेस्टनिकमध्ये एक लहान अणुभट्टी बसवण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून येणारी हवा थेट अणुभट्टीमधून पाठवते. अणुभट्टीच्या उष्णतेमुळे ही हवा प्रचंड तापते आणि मागील बाजूने वेगाने बाहेर फेकली जाते. त्यामुळे क्षेपणास्त्राला सतत गती मिळते. सिद्धांततः अशी प्रणाली इंधन संपण्याची समस्या दूर करते आणि क्षेपणास्त्राला जवळपास अमर्यादित अंतर पार करण्याची क्षमता देते.

तांत्रिक वैशिष्टय़े

बुरेव्हेस्टनिक सुमारे 12 मीटर लांबीचे असून त्यात थर्मोन्यूक्लिअर वॉरहेड बसवता येतो. त्याची गती ध्वनीच्या वेगाच्या सुमारे 75 टक्के म्हणजे उपध्वनी (Subsonic) श्रेणीतील आहे. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची अमर्यादित रेंज. 2025 मधील एका चाचणीत या क्षेपणास्त्राने सुमारे 14 हजार किलोमीटर अंतर 15 तासांत पार केल्याचा दावा करण्यात आला. हे क्षेपणास्त्र अनेक दिवस हवेत फिरत राहू शकते आणि शत्रूच्या संरक्षण व्यवस्थेला चकवा देण्यासाठी अनपेक्षित मार्गाने लक्ष्य गाठू शकते.

सामरिक दृष्टिकोनातून महत्त्व रशियाच्या दृष्टीने हे शस्त्र अत्यंत आकर्षक आहे. कारण पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs ठरावीक मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे आधुनिक रडार आणि संरक्षण प्रणाली त्यांचा मागोवा घेऊ शकतात. बुरेव्हेस्टनिक मात्र पृथ्वीभोवती मोठे वळसे घेत, समुद्राच्या जवळून किंवा दुर्गम भागातून उड्डाण करून लक्ष्यावर पोहोचू शकते. त्यामुळे त्याचा शोध घेणे आणि त्याला पाडणे अधिक कठीण ठरते.

तांत्रिक धाडस की बेपर्वाई?

जिथे या शस्त्राचे समर्थक त्याला अभूतपूर्व तांत्रिक उपलब्धी म्हणतात, तिथे अनेक वैज्ञानिक याला अत्यंत धोकादायक प्रयोग मानतात. डायरेक्ट-सायकल अणुभट्टी प्रणालीमुळे वातावरणात रेडिओऑक्टिव्ह वायू सोडले जाण्याची शक्यता असते. अरगॉन, क्रिप्टॉन आणि कार्बनचे किरणोत्सर्गी समस्थानिक वातावरणात पसरू शकतात. याचा परिणाम केवळ युद्धकाळातच नव्हे, तर चाचणीदरम्यानही होऊ शकतो. त्यामुळे हे शस्त्र प्रत्यक्षात उडत असताना स्वतःच एक प्रकारचा फिरता किरणोत्सर्गी प्रदूषण स्रोत बनते.

रशियाशिवाय जगातील कोणत्याही देशाने अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केलेले नाही. अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या सर्व देशांकडे अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्रs आहेत. मात्र त्यांची प्रणाली पारंपरिक इंधनावर आधारित आहे.

अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अनेक दशकांपासून वापरात आहेत. सामान्य परिस्थितीत त्या सुरक्षित मानल्या जातात. कारण त्यांच्यामध्ये मजबूत शील्डिंग असते. तथापि इतिहासात पाणबुड्यांचे अनेक अपघात झाले आहेत. सोव्हिएत संघाने जुन्या अणुभट्टय़ा आर्क्टिक समुद्रात टाकल्याची उदाहरणे आहेत. फुकुशिमा दुर्घटनेने दाखवून दिले की, रेडिओऑक्टिव्ह पदार्थ समुद्री अन्न साखळीत प्रवेश करून मानवापर्यंत पोहोचू शकतात. यावरून अणू तंत्रज्ञानातील एका छोटय़ा चुकीचे परिणाम किती व्यापक असू शकतात हे स्पष्ट होते. बुरेव्हेस्टनिकसारखी शस्त्रs जगाला नव्या शस्त्र स्पर्धेकडे ढकलू शकतात.

भारतासाठीचे धडे

भारताने या घडामोडींकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. भारताने स्वतः अशा धोकादायक तंत्रज्ञानाच्या मागे धावण्याऐवजी त्याविरोधात संरक्षणात्मक क्षमता विकसित करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. प्रगत रडार, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ट्रकिंग प्रणाली, उपग्रह निरीक्षण व्यवस्था आणि हायपरसॉनिक इंटरसेप्टर विकसित करणे आवश्यक आहे. Directed Energy Weapo हे म्हणजे लेझर आणि मायक्रोवेव्ह आधारित संरक्षण प्रणालींवरही भर द्यावा लागेल. मजबूत अणुप्रतिबंधक क्षमता भारताने आपल्या Second Strike Capability ला अधिक बळकट करणे आवश्यक आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांची संख्या वाढवून विश्वासार्ह अणुप्रतिबंधक क्षमता निर्माण करणे हे भविष्यातील सुरक्षेचे महत्त्वाचे साधन ठरेल.

 किरणोत्सर्गी पदार्थ माती, पाणी आणि वातावरणात मिसळल्यास त्याचा परिणाम पिढय़ान्पिढय़ा जाणवू शकतो. कर्करोग, जनुकीय दोष आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच अनेक पर्यावरण तज्ञ रशियातल्या बुरेव्हेस्टनिक या क्रूझ क्षेपणास्त्र्ााला ‘उडणारी अणुभट्टी’ असे संबोधतात.