
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील पैशांच्या चोरीने भाविकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. ट्रस्टच्या विनंतीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने एक एसआयटी स्थापन करून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी ठोस भूमिका मांडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दतात्रय होसबाळे यांनी राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी भाजपची कानउघाडणी केली आहे.
रामभक्तांच्या दीर्घ संघर्षातून, समर्पणातून आणि त्यागातून अयोध्येतील राम मंदिर उभारले गेले. आज ते हिंदू समाजासाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र आहे. रामलल्ला मंदिरातील दानपेटय़ांमध्ये जमा केलेल्या निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे हिंदू समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का बसला आहे. या घटनेमुळे आम्ही सर्व दुःखी झालो आहोत. या देणगी घोटाळ्याची ट्रस्टने गंभीर दखल घेऊन व्यवस्थापन आणि कामकाजातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, असे दतात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे.
संघ सर्व हिंदूंना या कठीण काळात संयम आणि धैर्य राखण्याचे आवाहन करत आहे. या घटनेचा फायदा घेऊन हिंदुत्वविरोधी शक्तींचे, समाजाला बदनाम करू पाहणाऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडा, असेही होसबाळे यांनी म्हटले आहे.
चंपत राय यांना तुरुंगात जावे लागेल!
राम मंदिरातील देणगीच्या पैशांचा अपहार झाला हे स्पष्टच आहे. प्रचंड मोठय़ा प्रमाणात पैसा हडपला गेला असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि आमंत्रित सदस्य गोपाल राव हे सध्या कसेतरी निसटले असले तरी भविष्यात त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे बजरंग दलाचे संस्थापक, राम मंदिर आंदोलनातील नेते विनय कटियार म्हणाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत माझ्या संपका&त आहेत. रात्री दीड-दोन वाजताही त्यांचा पह्न आला, असा दावा कटियार यांनी केला.
राम राम म्हणत भागवतांनी जोडले हात
नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना राम मंदिर दानपेटीतील गैरव्यवहार आणि चोरी प्रकरणी प्रश्न केला असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही टिप्पणी न करता केवळ हात जोडत ‘राम राम’ असे म्हणत निघून जाणे त्यांनी पसंत केले. दुसरीकडे संघाचे सहकार्यवाह होसबाळे यांनी मात्र स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.



























































