
जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नारंगी आणि जगबुडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच येथील नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नागरिक आणि व्यापारी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता भरणेनाका पुलाजवळ नदीची पाणी पातळी ५.१० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून ती ५.०० मीटरच्या इशारा पातळीपेक्षा अधिक आहे. परिणामी पुराचा धोका वाढल्याने जगबुडी नदीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नदी धोक्याच्या ७.०० मीटर पातळीपासून अद्याप खाली असली तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक वस्तू आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आवाहन खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.






























































