
हैदराबादमधील एका नामांकित हॉटेलमध्ये एका 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळ्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या तरूणीची हत्या झाली की आणखी काही या दिशेने पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एमडी लाईन्स जवळील ‘हॉटेल ग्रँड लॉज’मध्ये ही घटना घडली आहे. रेणुका असे मृत तरुणीचे नाव असून ती अलवाल भागातील रहिवासी होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रेणुका गुरुवारी रात्री फारुख (34) नावाच्या व्यक्तीसोबत या हॉटेलमध्ये आली होती. दोघांनी तिथे रूम बुक केली होती. फारुखने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो काही कामानिमित्त खोलीबाहेर गेला होता. काही वेळानंतर जेव्हा तो परतला, तेव्हा रेणुका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर त्याने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली.
कुटुंबाचा हत्येचा आरोप
या घटनेनंतर रेणुकाच्या कुटुंबीयांनी फारुखचा आत्महत्येचा दावा फेटाळून लावला आहे. रेणुकाची हत्या करण्यात आली असून यामध्ये फारुखचाच हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. रेणुकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी फारुखला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि हत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहेत. रेणुकाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.





























































