
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा एकदा धोकादायक झाला आहे. दरड कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या डोंगर कटाईनंतर निर्माण झालेला धोका अद्याप कायम आहे. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२०२१ मध्ये परशुराम घाटात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घाटातील उतार स्थिर करण्यासाठी गॅबियन भिंती उभारण्यात आल्या होत्या. तसेच पावसाचे पाणी सुरक्षितपणे खाली सोडण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या पाणी निचऱ्याच्या पायऱ्याही बांधण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात या पाणी निचऱ्याच्या पायऱ्यांचा काही भाग निखळल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नियोजित मार्गाऐवजी पुन्हा दरडप्रवण उताराकडे वाहू लागल्याने मातीची धूप वाढण्याची आणि मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संरक्षक उपाययोजनांच्या गुणवत्तेबाबत यामुळे प्रश्न उपस्थित होत असून, घाटातील सुरक्षिततेबाबत वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात या घाटातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने आणि प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.






























































