
जागतिक अस्थिरता, आाती देशातील अशांतता आणि अनेक देशांवर असलेल्या आर्थिक दबावामुळे रियल इस्टेट क्षेत्रालाही फटका बसला आहे. मात्र, देशात गेल्या सहा महिन्यात रियल इस्टेट क्षेत्राला चांगलीच उभारी मिळाली आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत देशातील स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक ५०% वाढून ४.५ अब्ज डॉलर झाली आहे. कॉलियर्स इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या सहा वर्षांतील कोणत्याही वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
अनेक लोकांनी ऑफिसच्या जागेत मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, घरांमधील गुंतवणूक घटली आहे. या आकडेवारीनुसार देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राने यावर्षी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत एकूण संस्थात्मक गुंतवणूक ५० टक्क्यांनी वाढून ४.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या प्रचंड वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे ऑफिसच्या जागेची वाढत असलेली प्रचंड मागणी आहे.
आखाती देशातील संकटामुळे जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत अनिश्चितता असूनही देशातील या क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. एप्रिल-जून तिमाहीत गुंतवणूक ७०% वाढून २.९ अब्ज डॉलर झाली. ही वाढ प्रामुख्याने देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या सहभागामुळे, मोठ्या सौद्यांद्वारे परदेशी निधीच्या पुनरागमनामुळे आणि मिश्र-उपयोग व पर्यायी मालमत्तांमधील वाढलेल्या गुंतवणुकीमुळे झाली.
अहवालानुसार, गुंतवणूकदार देशाला दीर्घकालीन फायद्यांची बाजारपेठ समजतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) हिंदुस्थानसाठी आर्थिक वर्ष २०२७ चा जीडीपी वाढीचा अंदाज ६.५% पर्यंत वाढवल्याने याला बळकटी मिळाली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय गुंतवणूकदारांनी आघाडी घेतली, त्यांनी २.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ८०% वाढ आहे. एकूण गुंतवणुकीत त्यांचा वाटा अंदाजे ५७% होता. पहिल्या सहामाहीत (२०२६ ची पहिली सहामाही) परदेशी गुंतवणूक २४% वाढून १.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. परदेशी गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवणे आणि मिश्र-वापर व पर्यायी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केले.
देशातील गुंतवणूकदार काही काळापासून एकूण गुंतवणुकीत ४०-६०% योगदान देत आहेत. तर परदेशी गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत आणि मिश्र-वापर व पर्यायी मालमत्तांसारख्या निवडक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहेत. या क्षेत्राच्या निरंतर वाढीसाठी दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांचे एकत्रीकरण आवश्यक आहे.
गुंतवणूकदारांसाठी कार्यालयीन विभाग हा प्रमुख पर्याय राहिला आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण गुंतवणुकीपैकी ४०% पेक्षा जास्त वाटा या क्षेत्राचा होता. कार्यालयीन जागेत एकूण १.९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्यात बहुतेक देशातील गुंतवणूकदारांनी विद्यमान मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली. गृहनिर्माण आणि विक्री क्षेत्रातील गुंतवणूक ४३% ने घसरून ०.५ अब्ज डॉलर्सवर आली. वाढता खर्च, घरांच्या विक्रीतील किंचित मंदी आणि प्रकल्पांच्या नफ्याबद्दलच्या चिंतांमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
मिश्र-वापर आणि पर्यायी मालमत्ता ही सर्वात वेगाने वाढणारी क्षेत्रे म्हणून उदयास आली. या दोन्ही क्षेत्रांनी अंदाजे ०.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित केली, जी एकूण गुंतवणुकीच्या अंदाजे २०% आहे. या क्षेत्रात पारंपरिक स्थावर मालमत्तेच्या पलीकडे जाऊ पाहणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांचे वर्चस्व होते.





























































