Beed news – छाप्यात सापडलेल्या खवा, पनीरमध्ये सापडली कॅन्सर होणार्‍या घातक सॅफोलाईटची भेसळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खवा, बर्फी, पनीर निर्माण करताना बर्फीवर चांदीचे वर्ख लावून असा माल तयार करून बीडसह जळगाव जिल्ह्यामध्ये पाठवणाऱ्या दुर्गम भागातील एका कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तेथे तयार होणारे खाद्यपदार्थ तपासले असता एक गंभीर बाब समोर आली आहे. खवा, बर्फी आणि पनीरमध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या घातक ‘सॅफोलाईट’ची भेसळ झाल्याचे समोर आल्याने प्रशासन हादरले आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथे घडली.

शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील एका ठिकाणी खवा, बर्फी आणि पनीर तयार केले जाते आणि ते बीड जिल्ह्यासह जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाठवले जाते, अशी गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाने सापळा रचून गुरुवारी रात्री दहिवंडी येथे छापा टाकला. या छाप्यामध्ये ३५ हजारांचा तयार माल जप्त करण्यात आला. सापडलेल्या मालाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यावेळी या खाद्यपदार्थात सॅफोलाईटची भेसळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे ही भेसळ सुरू होती आणि हा माल तयार करून बाजारात पाठवला जात होता. सॅफोलाईटयुक्त पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरसारख्या आजारांची लागण होते, हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे सॅफोलाईट?

सॅफोलाईट, ज्याला रासायनिक भाषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट किंवा रॉन्गालाइट असे म्हणतात, हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी असलेले एक शक्तिशाली रासायनिक द्रव्य आहे. याचा मुख्य वापर कापड उद्योगात कपड्यांना रंग देण्यासाठी केला जातो. तसेच कपड्यांवरील अतिरिक्त रंग काढण्यासाठीही याचा वापर केला जातो. हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक व विषारी द्रव्य आहे. दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच खवा आणि पनीर पांढरे शुभ्र, ताजे आणि चमकदार दिसण्यासाठी यात सॅफोलाईटची भेसळ केली जाते. सॅफोलाईट पोटात गेल्यानंतर पोटदुखी, अपचन आणि ॲसिडीटी यांसारख्या समस्या तातडीने उद्भवतात.