
एकेकाळी ‘ग्लास स्किन’ची क्रेझ होती, आता त्याच धर्तीवर ‘कोरियन ग्लास हेअर’ हा नवीन ब्युटी ट्रेंड जगभर लोकप्रिय होत आहे. आरशासारखी चमक, रेशमी पोत आणि निरोगी दिसणारे केस हे या ट्रेंडचे वैशिष्ट्य आहे. योग्य हेअर केअर रूटीन आणि काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास हा लूक मिळवणे शक्य आहे.
ग्लास हेअर म्हणजे नेमकं काय?
ग्लास हेअर म्हणजे केसांचा पृष्ठभाग इतका गुळगुळीत आणि निरोगी असणे की त्यावर पडणारा प्रकाश आरशाप्रमाणे परावर्तित होतो. त्यामुळे केस अधिक चमकदार, मुलायम आणि सरळ दिसतात. हा लूक केवळ स्टायलिंगमुळे नव्हे, तर केसांच्या योग्य निगेमुळे मिळतो.
ग्लास हेअर मिळवण्यासाठी फॉलो करा या 6 स्टेप्स
प्रथम तेल-आधारित क्लीन्झरने टाळूवरील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण काढून टाका. त्यानंतर सल्फेट-मुक्त शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. प्रदूषणात राहणारे किंवा वारंवार हीट स्टायलिंग करणाऱ्यांसाठी ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते.
शॅम्पूनंतर चांगल्या दर्जाचा कंडिशनर वापरल्याने केसांना आवश्यक ओलावा मिळतो. त्यामुळे केसांचा क्यूटिकल गुळगुळीत राहतो, फ्रिझ कमी होतो आणि नैसर्गिक चमक वाढते.
केसांना खोलवर पोषण देण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा. मध किंवा इतर नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केस अधिक मऊ, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते.
केस धुतल्यानंतर लिव्ह-इन कंडिशनर किंवा आर्गन, कॅमेलिया अथवा जोजोबा तेलयुक्त सीरम लावा. यामुळे केस दिवसभर गुळगुळीत राहतात आणि हीट स्टायलिंगमुळे होणारे नुकसानही कमी होते.
ओले केस छोट्या भागांमध्ये विभागून गोल ब्रशच्या मदतीने ब्लो ड्राय करा. योग्य तंत्र वापरल्यास केस अधिक सरळ आणि चमकदार दिसतात.
केसांना अंतिम चमक देण्यासाठी शाइन सीरम, हेअर प्राइमर किंवा शाइन स्प्रे वापरा. ब्लो ड्रायरमधील थंड हवेचा शेवटचा ब्लास्ट दिल्यास केस अधिक काळ सेट राहतात आणि त्यांची चमक टिकून राहते.
नैसर्गिक उपायही ठरू शकतात फायदेशीर
केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरू शकतात. तांदळाचे पाणी, नारळाचे तेल, कोरफडीचा गर, जास्वंदीच्या फुलांचे पाणी आणि मेथीच्या बियांचे पाणी यांचा नियमित वापर केल्यास केसांना पोषण मिळते आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.






























































