
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू असून काहीजणांना अटकही झाली आहे. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राम मंदिरातील या देणगी घोटाळ्याविरोधात आंदोलन पुकारत रणशिंग फुंकले आहे. यानंतर अखेर श्रीराम मंदिर देणगी घोटाळ्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ताधारी भाजपची कानउघाडणी केली आहे. राम मंदिरातील देणगी चोरीची घटना दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज आणि रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राममंदिर देणगी चोरीप्रकरणी आठ आरोपींना अटक केल्यानंतर आज अखेर श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला, तर विश्वस्त अनिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय मंदिर निर्माण प्रभारी गोपाल राव यांनाही मंदिर व्यवस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून गेल्या अनेक दिवसांपासून कारवाई सुरू आहे. हे प्रकरण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अखेर प्रतिक्रिया आली.
श्रीराम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे बलिदान आणि त्यागामुळे संपूर्ण हिंदू समाजासाठी श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. रामलला मंदिरातील दानपेटीत जमा झालेल्या रकमेच्या चोरीची घटना दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण समाज आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे, असे होसबळे यांनी म्हटले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या आग्रहाच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करून त्यांच्या शिफारशीनुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या तपासामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संपूर्ण हिंदू समाजाची न्यासाकडून हीच स्वाभाविक अपेक्षा आहे की, या अत्यंत निषेधार्ह घटनेला असामान्य मानून गांभीर्याने व्यवस्था आणि संचालनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, जेणेकरून अयोध्येतील राम मंदिरावरील कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा अखंड आणि अढळ राहील, असे होसबळे पुढे म्हणाले.
सध्या जी संभ्रमाची आणि संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती पूर्णपणे संपली पाहिजे. याविषयी आमची अशी अपेक्षा आहे की, मंदिर व्यवस्थापन आणि सरकारने स्थापन केलेली SIT या संदर्भात सर्व आवश्यक पावले उचलेल, अशी अपेक्षा व्यक्त करत दत्तात्रय होसबळे यांनी सत्ताधारी भाजपची कानउघाडणी केली आहे.




























































