
‘मंदिर वही बनायेंगे’ असा वज्रनिर्धार करत हजारो कारसेवकांनी अयोध्येच्या रामजन्मभूमीवर रक्त सांडून मंदिर उभारले. त्याचे भांडवल करून अमर्याद सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या राजवटीत राम मंदिराच्या दानपेटीवरच दरोडा घातला गेला. त्यामुळे जे जे मंदिर लुटताहेत त्यांना आता हिंदू माफ करणार नाहीत, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राम मंदिर लुटीविरोधात राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले. रविवारी दादर कबुतरखान्याजवळील ऐतिहासिक मारुती मंदिरापासून या आंदोलनाचा धडाका सुरू होणार असून हा वणवा गावागावात पसरणार आहे. पक्ष न पाहता तमाम हिंदू बांधव आणि रामभक्तांनी या चोरीचा जाब विचारण्यासाठी या आंदोलनात उतरावे, अशी हाक उद्धव ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई उपस्थित होते. भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा फाडण्याबरोबरच राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. अटलबिहारी वाजपेयी 90च्या दशकात म्हणाले होते – ‘अब हिंदू मार नही खायेगा.’ आता मी म्हणतो, ‘अब हिंदू माफ नही करेगा,’ असा घणाघात करतानाच, जे जे राम मंदिर लुटताहेत मग ते भाजपचे असोत वा कुणीही त्यांना हिंदू माफ करणार नाहीत, हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. पूर्वी हिंदूंना जागे करण्यासाठी महाआरती करत होतो, आता हिंदू जागा झाला आहे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तो या आंदोलनात सहभागी होणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
देशात सध्या गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्यांबद्दल अनास्था आहे. त्या परिस्थितीचे उत्तरदायित्व कुणाचेच नाही असा कारभार सुरू आहे. याच्या मुळावर आघात करण्याची वेळ आता आली आहे. संपूर्ण देश आज भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली आहे. अयोध्येतील राम मंदिर हे भाजपच्या सत्तेचे मूळ होते. राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होती. ती सारी दृष्ये जनतेच्या मनावर खोलवर रुजलेली आहेत. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्राची दंगल, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्पह्ट व दंगली यात हिंदूंनी बरेच काही सोसले होते. राम मंदिर आंदोलन सुरू होण्यापूर्वी संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोनच खासदार होते. भाजपने गांधीवादी समाजवाद अंगिकारलेला होता. तो सोडून राम मंदिराचे भांडवल करून भाजपा हिंदुत्वाकडे वळली. आता राम मंदिर झाल्यावर देशात अमर्याद सत्ता भोगताहेत. अशा भाजपच्या काळात राम मंदिर हा मुद्दा दानपेटीवरील दरोडेखोरीमुळे चर्चिला जातोये हे दुर्दैव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबईत राहणाऱ्या, महाराष्ट्रात राहणाऱ्या, देशात राहणाऱ्या हिंदूंनी या आंदोलनात यावे. मुंबईत राहणाऱ्या उत्तर हिंदुस्थानींनीही ‘जय शिवराय…जय श्रीराम’ म्हणत आंदोलनात उतरावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी सहन होत नाही ते जाब विचारण्यासाठी तिथे जमतील आणि अगदी भाजपच्या कालखंडात हिंदुत्व धोक्यात आहे म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांनाही मी आमंत्रित करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुन्हा अयोध्येत जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा स्वतः कधीच अयोध्येला गेलेले नाहीत असे सांगत मी अमित शहांबरोबर नक्कीच अयोध्येत जाणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, त्यावेळी झालेले राम मंदिराचे आंदोलन देशव्यापी होते. शिवसेनाप्रमुख त्यावेळी राज्यभर फिरले होते. राम मंदिरासाठी हिंदूजागृती असेल, शिलापूजन असेल त्या प्रत्येक घटनेचे फोटो शिवसेनेकडे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी राज्य उठवले आणि पेटवले होते. त्यातून स्फूर्ती घेऊन नंतर लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि त्यानंतर असे दोन वेळा अयोध्येत गेलो होतो. ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा त्यावेळी दिला होता. शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे व अन्य सहकारीही आपल्यासोबत होते, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. भाजपच्या लोकांना राम मंदिरातील दरोडेखोरी पटत नसेल तर त्यांनी पुढची रथयात्रा काढण्यास हरकत नाही, शिवसेना त्यात सहभागी होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
येत्या काळात राज्यभरातील खेड्याखेड्यात आंदोलन
दादरच्या कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरासमोर आंदोलनात रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठन केले जाणार आहे. मुंबईतील आंदोलन ही केवळ सुरुवात असून येत्या काळात राज्यभरातील खेड्याखेड्यात, जिल्हा पातळीवर, शहरांमध्ये जिथे जिथे राम मंदिर व हनुमान मंदिर असेल तिथे हा कार्यक्रम होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वारकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार असून राम मंदिराच्या लुटीबद्दल ज्यांच्या मनात आग आणि राग आहे ते सर्व भाजपला राम मंदिराच्या लुटीचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
अयोध्येत रामजन्मभूमी आहे, पण आमचा राम हृदयात आहे. हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे आमचे हिंदुत्व आहे.
हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणारे देशद्रोही
हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटताहेत ते देशद्रोह करताहेत, असा संताप व्यक्त करतानाच, देशभरात त्याविरोधात आंदोलन सुरू झालेय, महाराष्ट्रही त्यात मागे राहणार नाही, महाराष्ट्र त्या आंदोलनाचे नेतृत्व करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदूंच्या भावना कुणी खेळण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नये, असेही त्यांनी बजावले.
मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही
भाजपने काय स्वार्थासाठी राम मंदिराचा मुद्दा घेतला होता? असा थेट सवाल करतानाच, मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू कदापि माफ करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरासाठी ज्यांनी आंदोलन केले होते, जे तुरुंगात गेले होते, त्यातील काही लोक आजही आहेत. करसेवकांवर जो अत्याचार केला होता ते आजही कुणी विसरलेले नाही. त्याचा फायदा भाजप घेत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्या दरोडेखोरांना राज्यपाल, मंत्री बनवतील
राम मंदिरातील चोरीप्रकरणी उच्चपदस्थांना वाचवून छोटय़ा पदाधिकाऱ्यांना अडकवले जात आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ऑपरेशन राम मंदिरमधील जे चोर आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. असे होऊ नये की नंतर त्यांचा भाजपकडून सत्कार होईल आणि त्यांना राज्यपाल किंवा मंत्री बनवले जाईल.
देश धोक्यात आहे असे ज्यांना वाटते, ज्यांनी हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेले नाहीत त्या तमाम हिंदूंनी पक्ष न बघता या आंदोलनात सहभागी व्हावे. जे जे रामभक्त हिंदू असतील, जे अस्सल हिंदू आहेत, मग ते कोणत्याही पदावर बसले असतील, ज्यांना रामाबद्दल प्रेम आहे, ज्यांना मंदिरातील चोरीचा राग आला आहे, त्या सर्वांनी या आंदोलनात यावे.
अयोध्येला जाणार
राम मंदिर उभारण्यासाठी सर्वात पहिली 1 कोटीची देणगी शिवसेनेने दिली होती. मग दानपेटीत अपहार होत असेल तर थेट अयोध्येत जाऊन जाब विचारायला हवा, असे पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येत मी निश्चितच जाणार आहे. पण राम मंदिर आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता. महाराष्ट्रानेच भाजपला दिल्लीत बसवले. महाराष्ट्रात हे आंदोलन व्हायला हवे. महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो. राम मंदिर निर्माण झाले तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो.
ऑपरेशन राम मंदिर
राजकीय पक्ष फोडले जात आहेत. आमदार, खासदार चोरले जाताहेत. खरेदी-विक्री होतेय. याला ऑपरेशन नाव देतात. मग आता अयोध्येच्या राम मंदिरात जी दरोडेखोरी सुरू आहे त्याला भाजपचे ऑपरेशन राम मंदिर म्हणायचे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. राम मंदिरातील चोरीचा पैसा खासदार-आमदार फोडण्यासाठी वापरला जात असल्याचे बोलले जाते. हे फार गंभीर आहे. मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडले, अनेकांना तुरुंगवास झाला. हा त्याग आणि बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
स्थळ – हनुमान मंदिर, दादर
कधी – 5 जुलै, सायं. 4 वाजता




























































