
>> मंगेश वरवडेकर
पूर्वी पुतळे जळायचे… आता माणसं आतून जळतात! फुटबॉल हा खेळ आहे की भावना? हा प्रश्न विचारला तर उत्तर एकच असते.फुटबॉल म्हणजेच भावना, पण भावना जेव्हा विवेकाचा ऑफसाइड करतात, तेव्हा खेळ संपतो आणि सूड सुरू होतो.
एकेकाळी म्हणजे दहाएक वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. तेव्हा पराभवाची आग रस्त्यावर पेटायची. खेळाडूंची घरं फोडली जायची, गाड्या जाळल्या जायच्या, पुतळे जाळले जायचे. पोलीस संरक्षणात स्वतःच्या घरात शिरणारे खेळाडू आपण पाहिले आहेत. तेव्हा पराभव हा खेळाचाच भाग होता, पण खेळाडूंना शिक्षा मात्र गुन्हेगारांना दिल्यासारखी व्हायची.
आज काळ बदलला आहे. आता हातात दगड नाहीत… मोबाईल आहेत. आता पेट्रोलचे कॅन नाहीत… डेटा पॅक आहेत. आता पुतळे जळत नाहीत… प्रोफाईल जळतात. आता घरांवर हल्ले होत नाहीत… चारित्र्यावर हल्ले होतात. पूर्वी जमाव दारात उभा राहायचा. आज तो कमेंट बॉक्समध्ये बसतो. फरक फक्त माध्यमाचा आहे. जखम मात्र तितकीच खोल आहे. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही.
यंदाच्या वर्ल्ड कपने तर या डिजिटल हिंसाचाराचा कळस गाठलाय. फिफाच्या सोशल मीडिया संरक्षण यंत्रणेने साखळी फेरीत तब्बल 60 लाखांहून अधिक पोस्ट आणि प्रतिक्रिया तपासल्या. त्यातून त्यांना 89 हजार द्वेषपूर्ण पोस्ट हटवाव्या लागल्या. हा आकडा 2022 च्या वर्ल्ड कपपेक्षा तब्बल 13 पट अधिक आहे. त्यातील 11 टक्के पोस्ट वांशिक स्वरूपाच्या होत्या. सध्या एक हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्सची चौकशी सुरू झाली, तर शंभरहून अधिक प्रकरणे कायदेशीर कारवाईसाठी पुढे पाठवण्यात आली.
हे आकडे वाचताना अंगावर काटा येतो. कारण ही संख्या पोस्टची नाही… ती माणुसकीच्या पराभवाची आहे. या वर्ल्ड कपमधील सर्वात वेदनादायी प्रसंग नेदरलँड्सच्या खेळाडूंनी अनुभवला. मोरोक्कोविरुद्धच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये जस्टीन क्लवर्ट आणि क्विंटन टिंबर आणि क्रिसेन्सिओ समरविल यांचे प्रयत्न फसले. डच सामना हरले. त्यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर त्यांच्यावर वांशिक शिव्यांची लाखोली वाहण्याची वेबसीरिज सुरू झाली. तिचा वेग धूमकेतूपेक्षा अधिक होता. त्यांनी पेनल्टी चुकवली होती, पण ट्रोलर्सनी टीका करताना माणुसकीच गमावली होती. अखेर डच फुटबॉल महासंघालाही या प्रकाराचा निषेध करत फिफाकडे कठोर कारवाईची मागणी करावी लागली.
आजचा ट्रोल हा चेहरा नसलेला दंगलखोर आहे. त्याच्या हातात मशाल नाही, की बोर्ड आहे. तो रस्त्यावर घोषणा देत नाही, पण एका पोस्टने लाखो लोकांपर्यंत विष पोहोचवतो. त्याने कधी चेंडूला लाथ मारलेली नसते, पण खेळाडूच्या आत्मविश्वासाला लाथ मारण्यात तो जागतिक दर्जाचा असतो.
एका पेनल्टीची चूक… एका गोलरक्षकाचा चुकीचा अंदाज… एका स्ट्रायकरने रिकाम्या गोलपोस्टवर मारलेला बाहेरचा फटका… आणि काही सेपंदांत डिजिटल न्यायालय भरतं. न्यायाधीशही तेच, सरकारी वकीलही तेच आणि शिक्षा देणारेही तेच. इथे अपीलची संधीही मिळत नाही.
खरं सांगायचं तर सोशल मीडिया हा विचित्र आरसा झालाय. कालपर्यंत ‘तू आमचा हीरो’ म्हणणारा चाहता दुसऱया दिवशी ‘तू देशद्रोही’ म्हणतो. गोल झाला की देव… गोल चुकला की राक्षस! एवढय़ा वेगाने मतं बदलतात की चेंडूही कदाचित इतक्या वेगाने फिरत नसेल.
या वर्ल्ड कपमध्ये फिफाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घ्यावा लागला. रेफ्री आता फक्त मैदानावर शिट्टी वाजवत नाही. डिजिटल जगातही एक अदृश्य रेफ्री उभा आहे. तो द्वेषपूर्ण पोस्ट शोधतो, लपवतो, हटवतो. पण एक प्रश्न कायम राहतो की तंत्रज्ञान पोस्ट हटवू शकतं, पण मनातला द्वेष हटवू शकतं का?
फुटबॉल हा चुकांचा खेळ आहे. लिओनेल मेस्सीने पेनल्टी चुकवली आहे. ख्रिस्तिआनो रोनाल्डोने निर्णायक संधी गमावल्या आहेत. किलियन एम्बाप्पेलाही पराभव स्वीकारावा लागला आहे. हॅरी केनही अनेकदा गोल करता करता चुकलाय. महान खेळाडू चुकतात, कारण तीसुद्धा माणसंच आहेत. मात्र ट्रोलिंग करणाऱयांना वाटतं, मोबाईलच्या पडद्यामागे बसल्यावर ते देव होतात. ते काहीही करू शकतात.
पूर्वी संताप पेट्रोलने पेटायचा. आता तो डेटा पॅकवर पेटतो. पूर्वी दगडांनी काचा फुटायच्या. आता शब्दांनी मनं फुटतात. पूर्वी धूर घराबाहेर दिसायचा. आता तो खेळाडूच्या मनात भरतो. वर्ल्ड कपमध्ये एकच संघ विजेता ठरतो. उरलेले सर्व पराभूत होतात. पण पराभव ही खेळाची किंमत आहे. अपमानाची नाही.
गोल चुकणं हा खेळाचा भाग आहे. पराभव हासुद्धा स्पर्धेचा भाग आहे, पण एखाद्या खेळाडूला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या वर्णाला किंवा अस्तित्वालाच लक्ष्य करणं हा कोणत्याही खेळाचा भाग असू शकत नाही. आज पुतळे कमी जळतात, पण माणसं आतून जास्त जळताहेत. आधुनिक फुटबॉलसमोरचं सर्वात मोठं आव्हान विरोधी संघ नव्हे तर मोबाईलच्या पडद्यामागे बसलेला अदृश्य ट्रोल आहे. तो सुसाईड बॉम्बर झालाय. तो फुटला की हानी अटळ आहे.





























































