‘एसआयआर’ थांबवा, बॅलेट पेपवर निवडणुका घ्या; विरोधी पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र ,सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच देशातील विरोधी पक्षांनी ‘एसआयआर’ थांबवा आणि आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यावर विचार करण्याची मागणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे केली आहे. अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकीत गडबड झाली असून देशातील लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाल्याचे विरोधी पक्षांनी या पत्रात म्हटले आहे.

24 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची स्वाक्षरी असलेले पत्र सरन्यायाधीशांना पाठविले होते. ते काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आदी नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे. लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आल्याकडे लक्ष वेधताना या पत्रात लिहिले आहे की, घटनात्मक संस्था सरकारच्या अजेंडय़ाला रेटतात, त्यावेळी लोकशाही धोक्यात येऊ शकते. घटनात्मक संस्था दडपणाखाली आहेत आणि अनेक निवडणुकांचे निकाल प्रत्यक्ष जनमत दर्शवित नाहीत. त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे आलो आहोत. सर्व प्रयत्न अपयशी ठरतात, त्यावेळी लोक न्यायपालिकेवर विश्वास ठेवतात, असे पत्रात लिहिले आहे.