विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला मंत्री आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, विधानसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या कामकाजात चर्चेच्या वेळे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज पुन्हा एकदा चर्चाला आला होता. विरोधकांच्या 293च्या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळेस संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी अनुपस्थित होते. त्यावरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले. अखेर अधिकारी वर्ग धावत गॅलरीत येऊन बसला.

विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यास नाना पटोले उभे राहिले. राज्यात महावितरणचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून ग्रामीण भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता 8 ते 10 तास अघोषित लोडशेडिंग होते. वाढीव व चुकीची बिले देऊन ग्राहकांची लूट सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी महिनाभर थांबावे लागत होते. नाना पटोले तावातावाने बोलत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व संबंधित मंत्रीही सभागृहात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तेव्हा तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सभागृहात चार मंत्री उपस्थित असल्याचे सांगितले. त्यावर ऊर्जा खात्याचे मंत्री नसल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यावर विजय वडेट्टीवार उभे राहिले आणि आम्ही लोकांचे प्रश्न सभागृहात मांडतो. आमचे वैयक्तीक प्रश्न नसतात. त्यावर सभागृहात बसलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱयांना बोलवा असे निर्देश दिले.

सत्ताधारी सदस्यही आक्रमक

सभागृहात मुंबईच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. त्यावर अजित पवार गटाचे चेतन तुपे यांनी आक्षेप घेतला. भाजपचे अमित साटमही संतप्त झाले. मुंबई महापालिकेत एक आयुक्त व चार अतिरिक्त आयुक्त आहेत. पण त्यापैकी एकही अतिरिक्त आयुक्त सभागृहात उपस्थित नाही. दोन दिवसांपूर्वी याच विषयावर चर्चा झाली होती. पण तरीही अधिकारी अनुपस्थित असल्याचे साटम यांनी निदर्शनास आणले. तेव्हा मंत्री शंभुराज देसाई यांनी अधिकारी विधान परिषदेत असल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही अधिकाऱयांना पाठीशी घालू नका, असा पलटवार अमित साटम यांनी केला.