
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमाच्या काही क्लिप्सला अश्लील थंबनेल (फोटो) आणि कॅप्शन टाकून यूट्युब चॅनलवर प्रसारित केल्या जात आहेत. यामुळे कार्यक्रमाची बदनामी होत असून अधिकृत किंवा अनधिकृतपणे असे प्रकार करणाऱ्या विकृतांवर कारवाई करणार असल्याचा इशारा कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिला आहे.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रम गेल्या ८ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमाचे एक हजार भाग पूर्ण होत असून जगभरातील मराठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे अनेक भाग ऑफिशअल चॅनेलवर आणि पोर्टलवर तर दिसतातच, पण काही यूट्युब चॅनल्स पैसे कमावण्यासाठी या भागांच्या क्लिप्सवर अश्लील फोटो आणि कॅप्शन देऊन प्रसारित करीत आहेत. हे अत्यंत क्लेशदायक असल्याचा संताप गोस्वामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. अशा विकृतांविरोधात कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रेक्षकांनीही यूट्युबवर चुकीच्या पद्धतीने कार्यक्रमाची बदनामी करणाऱ्या चॅनलवरील व्हिडीओला रिपोर्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.





























































