
पावसात पत्रे उडून गेल्यामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेले शिळफाटा येथील पोस्ट कार्यालय आता पुन्हा सुरू होणार आहे. हे कार्यालय बंद असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. येत्या दोन महिन्यांत नवीन जागेत कार्यालय सुरू होणार आहे.
शिळफाटा येथील पोस्ट कार्यालयाचे पत्रे गेल्या वर्षी पावसाळ्यात उडून गेले. त्यामुळे हे कार्यालय पोस्ट विभागाने बंद केले. परिणामी येथील नागरिकांना पोस्टाशी संबंधित कामे करून घेण्यासाठी थेट खोपोलीत जावे लागत आहे. शिळफाटा येथील पोस्ट कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे पोस्ट विभागाकडे केली. या प्रसंगी शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोल शहाणे, प्रमोद महाडिक, ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष मोहन केदार, उद्योजक सुनील शिंदे, विलास चव्हाण उपस्थित होते. कार्यालय जर लवकर सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिष्टमंडळाने दिला होता.
शिळफाटा येथे पोस्ट खात्याने दोन रूम भाडेतत्त्वावर घेतले आहेत. या रूममध्ये हे कार्यालय येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शिफफाटा येथील नागरिकांना पोस्टाच्या कामासाठी खोपोलीपर्यंत पायपीट करावी लागणार नाही.
खोपोली शिळफाटा येथील पोस्ट कार्यालयात जवळपास १७ कर्मचारी आणि अधिकारी काम करीत होते. गेल्या वर्षी पावसात छत उडाल्यामुळे या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले होते.






























































