
पुणे जिल्हयातील बहुचर्चित लोहगडावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचले आहेत. सिया अग्रवालचा प्रियकर चेतन चौधरी याचा खास मित्र बीडचा असून, त्याला केतन अग्रवाल हत्याकांडाची इत्थंभूत माहिती होती, असा तपास यंत्रणेला संशय असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याची दरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या हायप्रोफाईल हत्याकांडाच्या अधिक चौकशीत आणखी एक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात अजून एकाला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला तरुण बीड जिल्ह्याचा असून आरोपी चेतन चौधरी याचा खास मित्र आहे. हा तरुण पुण्यातील बालेवाडी येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. केतन अग्रवाल हत्याकांडाची या मित्राला पूर्ण माहिती होती, असा पोलिसांना संशय आहे.
खून न करण्याचा दिला होता सल्ला
सिया आणि चेतन चौधरी यांच्यात शिजलेल्या कटाची माहिती या मित्राला होती. त्याने ‘केतनचा खून करू नका’ असेही सांगितले होते. केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर चेतनने याच मित्राची भेट घेतली होती. तर सियानेही त्याला फोन केला होता. सध्या पोलीस या बीडच्या तरुणाची कसून चौकशी करत आहेत.
पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली
व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्याकांडातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दोघांचीही पोलीस कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना शुक्रवारी (दि.३) वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळून लावत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली.
आरोपी सिया आणि चेतन पोलीस कोठडीत असताना तपास यंत्रणांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केल्याचा दावा न्यायालयात केला. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी सराव केलेल्या ठिकाणाचा पंचनामा, फाडून टाकलेल्या पासपोर्ट शी संबंधित ठिकाणाचा पंचनामा, आरोपींचे कपडे जप्त करणे आणि मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हरच्या तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. आरोपींच्या मोबाईलमधील डेटा मिळाला असून, त्याची समोरासमोर पडताळणी करणे आवश्यक आहे. रिकव्हर केलेल्या डेटामध्ये सांकेतिक भाषा आणि निकनेमचा वापर करून संवाद झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सियाचा दुसरा मोबाईलही जप्त असून, त्यामधील डिलीट डेटा रिकव्हर केला आहे. त्यातील भाषा आणि निकनेमची पडताळणी करण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देणे गरजेचे असल्याचा आग्रह सरकारी वकिलांनी केला होता. मात्र, बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी सिया तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगत त्याला विरोध केला.
आरोपींच्या संमतीशिवाय ‘नार्को टेस्ट’ नाही
नार्को विश्लेषण चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असते. त्यांच्या संमतीशिवाय चाचणीला परवानगी देता येणार नाही, असे न्यायाधिशांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी नोंदविला प्रत्यक्षदर्शीचा जबाब
घटनास्थळी काहीजण प्रत्यक्षदर्शी होते. संबंधितांचा जबाब आम्ही नोंदविला असून, त्यादृष्टीने तपासही केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही दोघांव्यतिरिक्त पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. आरोपींच्या मोबाइलमधील जप्त केलेल्या संभाषणांचा नेमका अर्थ, कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बाकी असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.





























































