
दिंडोशीत रहेजा कॉम्प्लेक्स व सच्छिदानंद बिल्डिंग आणि रिझवी ओकच्या बाजूला एक संरक्षण भिंत कोसळून त्याखाली मोटरसायकल दबल्या गेल्या. तहसीलदारांनी पंचनामे केले, पण काही कार्यवाही झालेली नाही. याकडे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यावर सरकारने याची त्वरित दखल घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधताना सुनील प्रभू म्हणाले की, मुंबईत दोन दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यात या इमारतींची संरक्षक भिंत कोसळली. त्याखाली काही मोटरसायकल दबल्या गेल्या. पंचनामे झाले, पण नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मी जिल्हाधिकाऱयांशी स्वतः बोललो. ही भिंत तत्काळ बांधायला पाहिजे. आता पुढील भिंत पडण्यापूर्वी या भिंतीचे काम तत्काळ करा म्हणून जिल्हाधिकाऱयांना आदेश देण्याची मागणी सुनील प्रभू यांनी अध्यक्षांकडे केली केली. या मागणीची विधानसभा अध्यक्षांनी त्वरित दखल घेतली.






























































