हे बघा कंधारकरांनो, शिवद्रोही! राष्ट्रवादी अजित पवार आणि मिंधे गटाचा जिजाऊ स्मारक सुशोभीकरणास विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

‘मन्याडचा ढाण्या वाघ’ अशी ओळख असलेले माजी खासदार डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला माँसाहेब जिजाऊंचा पुतळा घाणीच्या विळख्यात सापडला आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच मिंधे गटाने कडाडून विरोध केला.

२००६ मध्ये माजी खासदार डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या पुढाकारातून शहरात माँसाहेब जिजाऊ यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला. त्याला नगरसेवक संताजी देवकांबळे यांनी अनुमोदन दिले. तत्कालीन नगराध्यक्ष रामराव पवार यांच्या प्रयत्नामुळे प्रस्ताव मंजूर झाला. प्रेरणादायी असा पुतळा उभारण्यातही आला. मात्र पुढे नगर परिषदेने पुतळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. सध्या पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

माँसाहेब जिजाऊ यांचा पुतळा असलेल्या परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव काँग्रेसचे नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांनी गुरुवारी सभेसमोर ठेवला. मात्र अजित पवार गटाचे नगरसेवक मन्नान चौधरी तसेच मिंधे गटाचे नगरसेवक महेश पिनाटे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर कांबळे यांनी माँसाहेब जिजाऊंचा पुतळा घाणीच्या विळख्यात सापडला आहे. या परिसराची स्वच्छता होणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु अजित पवार गट आणि मिंधे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव फेटाळून लावला.

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याची स्वच्छता करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवभक्तांनी दिला आहे. यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर परमेश्वर जाधव, संभाजी लाडेकर, नितीन कोकाटे, धनंजय कौसल्ये, बालाजी काचमांडे, संतोष सोमासे, विशाल कौसल्ये, माणिक बटलवाड, संतोष बोरूळे, सचिन लाडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वंदे मातरमलाही विरोध केला होता

तत्कालीन नगराध्यक्षा कमल विश्वनाथ लुंगारे यांच्या कार्यकाळात हेच मन्नान चौधरी उपनगराध्यक्ष होते. मन्नान चौधरी यांनी सभागृहात वाजवण्यात येणारे वंदे मातरम् हे राष्ट्रगान बंद करण्याचा प्रस्ताव मांडून दहशतीच्या जोरावर तो मंजूर करून घेतला होता. शिवसेना नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी या दहशतीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे सभागृहात पुन्हा वंदे मातरम्चा गजर सुरू झाला.