
>> उदय जोशी
मतदार याद्या निर्दोष करण्याच्या वेडाने भाजप सरकारला झपाटले आहे. मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण अर्थात ‘एसआयआर’चे काम सध्या राज्यात सुरू असून त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मराठवाड्यात ‘एसआयआर’साठी शाळा वाऱ्यावर टाकून तब्बल २० हजार शिक्षक दारोदार फिरत आहेत. ‘एसआयआर’चे काम ऑगस्टपर्यंत चालणार आहे, त्यामुळे शाळाही या काळात भरणार की नाही, याबाबत शंका आहे.
मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी सखोल पुनरिक्षणाचे काम सध्या करण्यात येत आहे. या कामासाठी मराठवाड्यात जिल्हा परिषदेच्या २० हजार शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे देण्यात येऊ नयेत याबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु जनगणना, मतदार याद्या, निवडणुका आल्या की शिक्षकांनाच कामाला जुंपले जाते. उन्हाळी सुटी संपल्यानंतर जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये शाळा बंदच राहणार पुढील दोन महिने विद्याध्यर्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ‘एसआयआर’चे काम होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
प्रवेश प्रक्रिया थंडावली
जून, जुलै महिन्यात शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया जोरात असते. शिक्षकही नवीन विद्यार्थ्यांच्या शोधासाठी प्रयत्नरत असतात. मात्र शिक्षकांना ‘एसआयआर’च्या कामाला जुंपण्यात आल्याने नवीन विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडे कसे येणार? शिक्षकच नसल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया थंडावली आहे.
दोन कामे करणे अशक्य
मतदार याद्यांचे पुनरिक्षण करून उरलेल्या वेळेत शाळेत शिकवण्याचे काम करावे, असे फर्मान सरकारने सोडले आहे. एका शिक्षकाकडे साधारण हजारपेक्षा जास्त मतदारांची नावे आहेत. एका कुटुंबाचा अर्ज भरून घेण्यासाठी किमान एक तास जातो. दुपारपर्यंत पुनरिक्षणाचे काम करून नंतर शाळेत जाण्यासाठी शिक्षकांमध्ये मानसिक शक्ती असेल का?
सुशिक्षित बेकारांची रीघ लागली असती
मतदार यादी पुनरिक्षण अभियानासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता दिला जात आहे. शिक्षकांना किमान या कामापोटी २५ हजार रुपये जास्तीचे पदरात पडणार आहेत. जर सरकारने शिक्षकांऐवजी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नियुक्त करून या अभियानामध्ये सामील करून घेतले असते तर त्यांचाही आर्थिक फायदा झाला असता.
हे काम शाळेच्या व्यतिरिक्त करायचे आहे
मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामासाठी शिक्षकांना नेमण्यात आले आहे. शाळा करून त्यांना हे काम करायचे आहे, त्यामुळे विद्याध्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. मनोज घोडे, उपजिल्हाधिकारी, बीड शाळाही करायची आहे, एसआयआरचेही काम करायचे आहे. दोन्ही कामांचा शिक्षकांवर प्रचंड ताण आहे. शिक्षकही माणूस आहे, यंत्र नाही. शिक्षक हा वेठबिगार नाही. मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामे लादण्यात आल्यामुळे त्याचा ज्ञानार्जनावर परिणाम होणारच. लक्ष्मण बहिरवाळ, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना





























































