मित्राला जामीनदार राहणे भोवले, दीड लाखासाठी सावकाराने सवा कोटीची जमीन बळकावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका मित्राला पैशाची अडचण होती, म्हणून जामीनदार राहणे दुसऱया मित्राला चांगलेच भोवले. एका खासगी सावकाराने अवघ्या दीड लाखासाठी या तरुणाची सवा कोटीची जमीन बळकावली आहे, हा संतापजनक आणि लाजिरवाणा प्रकार लातूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पुंडलिक भोसले असे जामीनदार राहिलेल्या तरुणाचे नाव आहे.

लातूर जिह्यातील निलंगा तालुक्यातील नणंद या गावात हा प्रकार घडला आहे. पुंडलिक भोसले यांच्या एका मित्राने खासगी सावकाराकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. यासाठी पुंडलिक भोसले हे सावकाराकडे जामीनदार राहिले होते. जामीनदार असल्यामुळे त्यांना सुमारे सवा कोटी रुपये किमतीची पाच एकर शेती सावकाराच्या नावावर करून द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पोलिसात गुन्हादेखील दाखल झाला आहे. पीडित शेतकऱयाने आपली जमीन सावकाराच्या नावावर केल्यानंतर एवढे करूनही अजून 70 ते 80 लाख रुपयांचे व्याज बाकी असल्याचा दावा करत सावकाराचा तगादा आजही सुरू असल्याने भोसले कुटुंबीय अडचणीत आले आहेत. निलंगा पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.

– अवघ्या दीड लाखासाठी व्याजापोटी 30 ते 40 लाख रुपये आणि साडेतीन एकर जमीन नावावर करून दिल्यानंतरही सावकार म्हणतो की, कर्ज संपले नाही. व्याज देण्याचा तगादा लावला असून त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. खासगी सावकाराच्या या जाचाला कंटाळून गावातील 20 ते 22 लोकांनी गाव सोडले आहे.

– सावकाराकडून 1 लाख रुपये अवघ्या तीन महिन्यांसाठी पाच टक्के मासिक व्याजाने दिले जातात. यासाठी दोन जामीनदार घेतले जातात. ठरलेल्या मुदतीत मुद्दल आणि व्याज न दिल्यास दररोज हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. जामीनदारांनाही शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण केली जाते.