
मंदिरातील दानपेटीतील रकमेवर डल्ला मारणाऱ्या तिघांना भोईवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिघांकडून चोरीच्या दोन दानपेट्या व रोकड जप्त केली आहे.
दादर पुर्वेकडील नायगाव येथील सदानंद मार्गावर व्याघ्रेश्वर महादेव मंदिरातील दोन दान पेट्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी तक्रार दाखल होताच भोईवाडा पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनाली निमसे व पथकाने सीसीटिव्ही तपासले असता आरोपी कोण ते निष्पन्न झाले. मग तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे तिचा आरोपींना तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन दान पेट्या, 16 हजारांची रोकड, अॅक्टीव्हा दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रोहित खंडागळे, आदित्य प्रसाद आणि साहिल शेख अशा तिघांना पकडण्यात आले. यातील एकावर चोरीचे चार गुन्हे दाखल असून अन्य दोघांवर देखील गुन्हे नोंद आहेत.




























































