
मुंबईत यंदा 132 टक्के नालेसफाई झाली असे पालिकेच्या वतीने सांगण्यात येते. मुंबई महापालिकेत पावसाळ्यापूर्वी 70 टक्के आणि पावसाळ्यानतंर 30 टक्के नालेसफाई होते. जर 70 टक्क्यांपैकी 132 टक्के काम झाले असेल तर तर मग मुंबई पाणी का तुंबले, असा सवाल शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
मुंबईच्या प्रश्नावर बोलताना अनंत नर यांनी पालिकेच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. मुंबईकरांना खऱया अर्थाने सुविधा द्यायच्या असतील तर प्रशासनावर पकड असणे गरज आहे. जानेवारीमध्ये महापौरांची निवड झाली. पण 2022 पासून मुंबई महानगर पालिका शासनाच्या माध्यमातून चालवली जात होती. त्यामुळे प्रशासन सुस्त झाले आहे. मुंबई महापालिकेने ‘पी’ उत्तर विभाग कार्यालय सुरू केले, पण कार्यालयात 25 टक्केही प्रशासकीय अधिकारी नाहीत. या कार्यालयाच्या अंतर्गत पालिकेचे आठ प्रभाग आहेत. पण कार्यालयातील यंत्रणा सक्षम नसेल तर नागरिकांना कसा न्याय देता येईल, असा सवाल त्यांनी केला.
व्हिजिलन्सवर ‘व्हिजिलन्स’ची गरज
उद्यान विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. 25 टक्के कामेच होत नाहीत. अनेक तक्रारी केल्या कामे न करताच ठेकेदारांची बिले काढली आहेत. पडद्यामागे काय चालले हे बघण्याची गरज आहे. महापालिकेत व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्याचे काम व्हिजिलन्स डिपार्टमेंटमार्फत होते, पण व्हिजिलन्स खात्याची चौकशी करण्याची गरज आहे. ते डिपार्टमेंटच भ्रष्ट असेल तर त्या खात्यावर लक्ष ठेवण्याची गरज अनंत नर यांनी व्यक्त केली.






























































