पावसाळ्यापूर्वी विशेष सभेच्या मागणीकडे महापौरांचे दुर्लक्ष, विरोधकांनी अनेक पत्रे पाठवूनही उत्तर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून 10 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने आणि साकीनाका येथील खैरानी रोड येथे मेनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेची नालेसफाईची आणि मान्सूनपूर्व कामे फेल गेल्याचे दिसून आले आहे. याविरोधात सर्वत्र जोरदार टीका होत आहे. अशातच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सभा घेण्यात यावी, या विरोधकांच्या मागणी पत्राकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेचे नियोजन व्हावे, यासाठी 30 मार्च रोजी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौर कार्यालयात देण्यात आले होते. मात्र महापौर रितू तावडे यांनी अद्याप या पत्राची दखल घेतलेली नाही. पावसाळा सुरू झाला तरी पत्राला उत्तर मिळाले नसल्याने महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत महापौरांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना जाब विचारला. लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घेतली जात नसेल तर सामान्य जनतेचे काय, असा सवाल पेडणेकर यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांनी घुसखोरी केल्याचा आणि गोपनीयतेचा भंग करणारी कृती केल्याचा आरोप महापौर रितू तावडे यांनी केला. तसेच किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. किशोरी पेडणेकर यांनी महापौरांचे आरोप फेटाळले.

 नुकत्याच घडलेल्या चेंबूर आणि साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष सभा बोलावण्याची मागणी विरोधकांनी आज केली. स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनी महापालिका सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यावर स्थायी समिती सदस्य रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव आणि अशरफ आझमी यांच्या सह्या आहेत.