
जालना-वडीगोद्री मार्गावरील शहापूरजवळ असलेल्या गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अंबड आगाराच्या दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली असून, दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बसमधील शाळकरी विद्यार्थ्यांसह साधारण 25 ते 30 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
गल्हाटी नदीच्या पुलावरच ही धडक झाल्याने मोठी दुर्घटना टळली; हा अपघात जर पुलाच्या मागे किंवा पुढे झाला असता, तर बस दरीत कोसळून खूप मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘मानव विकास मिशन’ची निळी बस चालक सारंग ढोले आणि वाहक सुनील भसमारे हे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन भांबेरी येथून अंबडच्या दिशेने जात होते. याच वेळी शहापूर परिसरातील गल्हाटी नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अंबड आगाराच्या दुसऱ्या बसची आणि मानव विकासच्या बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुसऱ्या बसचे चालक संजय ठोसर आणि वाहक भारती शंकर हे होते. या भीषण अपघातात दोन्ही बसचे चालक सारंग ढोले आणि संजय ठोसर हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताच्या वेळी मानव विकासच्या बसमध्ये जवळपास 25 ते 30 शाळकरी विद्यार्थी होते, तर दुसऱ्या बसमध्ये 12 ते 15 प्रवासी प्रवास करत होते. दोन्ही बसची धडक इतकी तीव्र होती की यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.



























































