
पावसाच्या सरी कोसळल्यानंतर निसर्गातील अनेक घटक जागृत होतात. जागोजागी उगवणारे हिरवे अंकूर तर सातत्याने लक्ष वेधून घेतात. तप्त धरणीमातेला जलस्पर्श झाल्यानंतर हजारो प्रकारच्या वनस्पती आपले अस्तित्व अधोरेखित करतात . यावर येणारी रानफुले म्हणजे एक नयनरम्य नजाराच असतो. सध्या उंच वृक्षांवर लोंबणाऱ्या गुलाबी पांढऱ्या रंगाच्या सीतेच्या वेण्या निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. आठवडाभर ताजेतवाने रहाणारे हे फुलोरे पाहिले की, नेत्र तर सुखावतातच शिवाय गंध हृदयापर्यंत पोहचत असल्याने मनही सुगंधी बनून जाते. निसर्गाचा हा अप्रतिम नजारा नेत्रसुख देणारा ठरत आहे.
गरम्याचा ग्रीष्म संपला की, हळू हळू वर्षा ऋतूची चाहूल लागते. हवेत बाष्प वाढलं की, रान फुलं हळूहळू प्रकट होऊ लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावलेले जुने वट वृक्ष, आंबे अशी मोठी झाडं या ऑर्किडची जन्म स्थान असतात. यांच्या जीर्ण झालेल्या फांद्यांवर ऑर्किडची लहान पानं आणि छोटीशी मुळे दिसतात. हवेतील बाष्प शोषून त्यावर जगणारी ही झाडं फोटो सिंथेसिसने आपलं अन्न बनवत असतात त्यामुळे ती पूर्ण परोपजीवी नाहीत. सीतेच्या वेणीच्या फुलांचा पांढरा, फिक्कट गुलाबी असा आकर्षक रंग या फुलांवर नजर खिळवून ठेवतो तर, या फुलांचा गंध थेट हृदयापर्यंत पोहचत असल्याने नेत्र मिटण्यास भाग पाडतो. एकदा आलेला सीतेच्या वेणीचा फुलोरा आठवडाभर ताजातवाना रहातो हे विशेष.
सीतेची वेणी म्हटली जाणारी फुलं अनेक औषधी मध्ये उपयोगी आहेत. आसाम मध्ये बिहू सणात या गजऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे. तसेच आसाम मध्ये लग्न समारंभामध्ये ही फुलं महत्त्वाचा भाग आहेत. नववधू च्या शृंगाराचा साज या फुलांशिवाय पूर्ण होत नाही. फॉक्स टेल ऑर्किडही ईपीफाइट वर्गीय वनस्पती आहे. म्हणजेच यांना आधारासाठी दुसऱ्या झाडाची आवश्यकता असते. मात्र बांडगूळ प्रमाणे ह्या वनस्पती परजीवी मात्र नसतात. याउलट झाडावर साठणारे अन्नकण, हवा पाणी आणि पाऊस या मार्गांनी आवश्यक मूलद्रव्ये मिळवतात. अशा प्रकारची विशिष्ठ उत्परीवर्तने यामंधे पाहायला मिळतात. यामुळेच अन्न साखळी मध्ये या झाडांचं महत्व अनन्य साधारण आहे. याचा आढळ तसा देशात सर्वत्र आहे. परंतु जुने वृक्ष जसे तोडीच्या आधीन झाले तशी या वनस्पतींची संख्या कमी होऊ लागली आहे. केरळ आणि मलबार भागात या वनस्पतीचा उपयोग दमा टीबी आणि किडनी विकार बरे करण्यासाठी केला जातो.
कोकणात नुकतेच विकास प्रकल्प जोरात चालू झालेत. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या बाजूने लावलेले पांथस्त वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले, यात मुख्यतः वड पिंपळ उंबर असे वृक्ष होते, जे या सीतेच्या वेणीच्या गजऱ्याचे आधार वृक्ष होते. यामुळे या फुलांना आता आसराच राहिला नाही. पुन्हा वृक्षारोपण केले जाईल पुन्हा वृक्ष मोठे होतील तोपर्यंत या वनस्पतींचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचं आहे. तसेच गार्डनर समूहाने ही मोठ्या प्रमाणात ऑर्किड बागेत लावण्यासाठी अधिवासातून उपटून नेले. खरं तर अश्या वनस्पती बागेत नेताना त्याची परिसंस्था जात नसते. त्या वनस्पतीला परागीभवन होण्यासाठी लागणारे कीटक जात नसतात. त्यामुळे बायो पायरसीचा प्रश्न ही मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वावर मात करून पावसाच्या पहिल्या सरित आपल्या सुगंधाने मोहित करणारे गजरे दरवर्षी नव्याने उगवतील हीच भाबडी आशा.




























































