
सोनम डोंगरे या गर्भवतीचा पोटातील बाळासह मृत्यू झाल्यानंतर ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उपलब्ध औषधांचा साठा सिल करण्यात आला आहे. गुणवत्ता तपासण्यासाठी ही औषधे आणि इंजेक्शन ठाणे येथे अन्न आणि औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणानंतर गर्भवतींना देण्यात येणाऱ्या ड्युवाडिलन आणि डेक्सा मेथासोन या दोन्ही इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे.
सोनम डोंगरे व रिचा मिश्रा या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलांवर उपचारादरम्यान संबंधित इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर दोघींचीही प्रकृती गंभीर झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले. मात्र उपचारादरम्यान सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला तर रिचा मिश्रा यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर मृत्यूच्या कारणांवाबत विविध शक्यता तपासल्या जात असून औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणताही संशय राहू नये यासाठी संबंधित इंजेक्शनचा संपूर्ण साठा सीलबंद करण्यात आला आहे. या औषधांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत.





























































