
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीत घोटाळा झाल्याच्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला किरकोळ चोऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले असले, तरी गेल्या वर्षी महाकुंभ दरम्यान भाविकांची गर्दी आणि देणग्यांचा ओघ वाढला तेव्हा, हा प्रकार अधिक संघटित पद्धतीने सुरू झाला. रोकड मोजणीच्या प्रक्रियेत अधिक लोकांचा समावेश झाल्यानंतर या चोरीच्या व्याप्तीत मोठी वाढ झाल्याचे मंदिर प्रशासन आणि पोलिसांच्या उच्चपदस्त सूत्रांनी सांगितले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरात दररोज सरासरी ८४ हजार ते १ लाख भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या वर्षी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ उत्सवाच्या काळात गर्दीच्या मुख्य दिवसांमध्ये हा आकडा थेट १० ते १२ लाखांवर पोहोचला होता. या काळात देणग्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मदतीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांच्या शिफारशीवरून रोकड मोजणीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मंदिर प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाकुंभ काळातच गर्दी आणि देणग्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. परंतु, ही भरती एसबीआयसाठी काम करणाऱ्या एका खासगी एजन्सीमार्फत करण्यात आली. सर्व काही विश्वासावर चालले होते. त्यामुळे हे प्रकरण इतके संघटित रूप घेईल, अशी कोणालाही कल्पना नव्हती.”
रोकड मोजणीचे व्यवस्थापन आणि ती बँकेच्या शाखेत सुरक्षितपणे पाठवण्यासाठी एसबीआयने ‘सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस’ या एजन्सीची सेवा घेतली होती. या एजन्सीचे संचालक गौरव सिंग यांनी स्पष्ट केले की, “त्यांची संस्था बँकांना केवळ हाऊसकीपिंग कर्मचारी पुरवते, बँकिंग कामांशी संबंधित नाही.” राम मंदिरातील भरतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “त्यांना स्वतःहून कर्मचारी निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते तर, एसबीआयनेच त्यांना काही नावे दिली होती. त्यांनी केवळ या व्यक्तींच्या आधार कार्डांची पडताळणी करून कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली होती. या संदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावे आता तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सुपूर्द करण्यात आले आहेत.”
हे संपूर्ण प्रकरण ट्रस्टशी संबंधित दोन सदस्यांमधील अंतर्गत वादामुळे चव्हाट्यावर आले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “चोऱ्यांची माहिती मंदिर प्रशासनाला आधीपासूनच होती. परंतु, अलीकडे घडलेल्या काही घडामोडींमुळे एकापाठोपाठ एक गोष्टी उघड होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सुरुवातीला संशयितांना चोरीचे पैसे परत खात्यात जमा करण्यास सांगून हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मंदिरात पीएसी, सीआरपीएफ आणि उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दलाची कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही रोकड मोजणी कक्षातील सुरक्षा तपासणी अपुरी ठरल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तपास अधिकारी या प्रकरणात पोलीस आणि एसबीआय अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आठपैकी सात आरोपींकडून सुमारे ८० लाख रुपये आणि विविध देशांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, २५ जून रोजी एफआयआर दाखल झाल्यानंतरही मंदिरातील भाविकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही आणि दररोज सरासरी ८5 हजार ते १ लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत.





























































