राहुरीत शाळेची बस उलटली; २० ते २५ विद्यार्थिनी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी शहरातील एका खासगी शाळेची विद्यार्थिनींना घरी सोडण्यासाठी जात असलेली स्कूल बस शुक्रवारी सायंकाळी तांदूळवाडी शिवारातील बिरोबा मंदिराजवळ उलटली. या अपघातात २० ते २५ विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० ते ४५ विद्यार्थिनी होत्या. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील एका खासगी शाळा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुटल्यानंतर रेल्वे स्टेशन, तांदूळवाडी, कोंढवड व शिलेगाव परिसरातील सुमारे ५० ते ५५ विद्यार्थिनी बसने घरी निघाल्या होत्या. मार्गात काही विद्यार्थिनी रेल्वे स्टेशन व गावठाण परिसरात उतरल्या. त्यानंतर बस तांदूळवाडीकडे जात असताना बिरोबा मंदिराजवळ अचानक बसचा रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन उलटली.

अपघात होताच विद्यार्थिनींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थिनींना बाहेर काढण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी विद्यार्थिनींना तत्काळ राहुरी शहरातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थिनी तांदूळवाडी, कोंढवड आणि शिलेगाव येथील असल्याचे समजते.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शालेय बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, शालेय वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी व सुरक्षेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.