Dapoli News – म्हाप्रल पंदेरी मार्गावरील लोकरवण येथील कॉजवेवर आले पुराचे पाणी; वाहतूक विस्कळित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल-पेवे पंदेरी दरम्यानच्या खाडीपट्टयात जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील नद्या, नाले, ओढे, प-हे, ओहोळ हे पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात पुरदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडले आहेत. त्यात प्रामुख्याने या मार्गावरील लोकरवण हद्दीतील एका कॉजवेवरून पाणी वाहू लागल्याने येथील वाहतूक पुर्णतः विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी महाडला जाणारी एसटी बस ही लोकरवण येथुनच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परत मंडणगड एस टी आगाराकडे माघारी फिरवावी लागली.

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल ,लोकरवण , पडवे , उंबरशेत, पेवे , पंदेरी , बहिरवली आदी भाग हा खाडी पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा खाडी पट्टा भागातून घोसाळेकडून पुढे पंदेरी, पेवे ,लोकरवण मार्गे म्हाप्रलला बाहेर पडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावरून या परिसरातील काही गावांना मंडणगड तालूका मुख्यालयाकडे येण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे मुंबई , पुणे शहराकडे जाणारा तसेच रायगड जिल्ह्यातील गोरेगाव आणि महाड येथे बाजारहाट करण्यासाठी या परिसरातील बहुतांश लोक नेहमीच जात असतात तसेच महाविदयालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थीसुध्दा येथे दररोजच प्रवास करत असतात त्यांना पुर परिस्थितीमुळे जाता आले नाही.

म्हाप्रल पेवे पंदेरी हा मार्ग खाडी पट्ट्यातील गावांसाठी अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर लोकरवण येथे असलेल्या एका छोट्या कॉजवेवरून दरवर्षीच्या पावसाळ्यात जरा जरी पुरपरिस्थिती निर्माण झाली तरी पाणी वाहू लागते आणि या मार्गावरील वाहतूक ठप्प पडते त्याचा फटका येथील अनेक गावांना बसतो. त्यामुळे लोकरवण येथील कॉजवेची पुनर्बांधणी करुन उंची वाढवली तर ही समस्या कायमची निकाली निघेल
— शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे म्हाप्रल विभागाचे उप विभाग प्रमुख आणि लोकरवण ग्रामपंचायतची सरपंच श्री.अशोक गोठल यांनी मागणी केली आहे.