Ratnagiri News – चिपळूणमध्ये आढळले दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरात अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळल्याने वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एका अपार्टमेंटच्या टेरेसची स्वच्छता करत असताना एका तरुणाच्या नजरेस इमारतीखालील झाडाझुडपांमध्ये मुक्तपणे वावरणारे हे पांढरे मुंगूस पडले. त्याने त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हिडिओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला असून, हा प्रकार दुर्मिळ असला तरी अशा वन्य प्राण्यांना कोणताही त्रास देऊ नये, त्यांना पकडण्याचा किंवा त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी केले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, हा प्रकार बहुतांश वेळा ल्युसिझम (Leucism) या नैसर्गिक आनुवंशिक वैशिष्ट्यामुळे आढळतो. त्यामुळे प्राण्याच्या अंगावरील रंगद्रव्य कमी असल्याने त्याचा रंग पांढरट दिसतो. मात्र अशा प्राण्यांचे डोळे लाल नसतात. त्यामुळे हा पूर्ण अल्बिनो (Albino) नसून त्याच्यात नैसर्गिक रंगद्रव्याची कमतरता असते.

वन अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ मुंगसाचे नेमके ठिकाण जाहीर न करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरता यावे आणि त्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संवेदनशीलता दाखवावी, असेही त्यांनी सांगितले. मुंगूस हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. साप, उंदीर, घुशी तसेच पिकांचे नुकसान करणारे इतर लहान प्राणी व कीटक यांवर नियंत्रण ठेवण्यात. त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच शेतीसाठीही तो अत्यंत उपयुक्त वन्यजीव मानला जातो. अशा दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन झाल्यास त्यांना त्रास न देता तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे.