Ratnagiri News – दापोली सारंग मार्गावरील कोंडीजवळ खोल दरीकडील रस्ता खचला; वाहतूक झाली धोक्याची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील वर्षीच्या पावसाळ्यात दापोली सारंग मार्गावरील कोंडीजवळ रस्त्याची वेळीच सुधारणा केली गेली नसल्यामुळे यावर्षी सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने आणखीनच रस्त्याची बाजू खचली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठी धोक्याची झाली आहे.

दापोली मुख्यालयाच्या ठिकाणाहून सारंग कळंबट वाघवे म्हैसोंडे अडखळकडे जाणारा मार्ग हा  वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे.  असा हा मार्ग कोंडी नावाच्या ठिकाणाजवळ एका बाजूने गेल्या पावसाळ्यात खचला होता. खचलेल्या रस्त्याची दरीकडील बाजू किमान शंभर फुट आहे. त्यामुळे या मार्गावर एखादे भरधाव वेगाने वाहन आले तर ते थेट दरीत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती असतानाही वर्षभरात  सार्वजनिक बांधकाम विभागाला खचलेल्या रस्त्याची सुधारणा करण्याचे  काम करता आले नाही. त्यामुळे या मार्गावरून दररोज दापोलीत काम करायला येणाऱ्या कामगारांचे, शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, सरकारी आस्थापनांच्या कार्यालयात कामे करण्यासाठी येणाऱ्यांना, दापोली हे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने वस्तू खरेदीसाठी येणाऱ्यांच्या जिवावर बेतणारी परिस्थिती केवळ आणि केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे झाली आहे.

दापोलीत सध्या मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. या बरसणाऱ्या पावसाने सगळीकडेच पाणी केले आहे. त्यामुळे  जमिनही भुसभुशीत झाली आहे. तर  वेळीच रस्त्यांची सुधारणा केली जात नसल्याने रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे पडलेले आहेत अशा या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे गढुळ पाणी साचून राहत असल्याने रस्त्यातील खड्ड्यांच्या खोलीची नेमकी व्याप्तीच समजून येत नसल्याने आधीच या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होते त्यात आता  या एका समस्येने डोके वर काढले आहे.कारण  मागील वर्षी या मार्गाची खोल दरीकडील  ढासळलेल्या भागाची सुधारणा केली गेली नसल्याने यावर्षी पाऊस पडण्यास सुरुवात होताच पुन्हा एकदा दरीकडील बाजू आणखीनच ढासळली आहे. असे असले तरी वाहने हळू चालवा पुढे रस्ता खचला आहे अशाप्रकारचा धोका दर्शवणारा फलक सुद्धा लावण्याचे साधे काम सार्वजनिक बांधकाम अजूनही करु शकले नाही त्यामुळे या मार्गावरील कोंगळे , ताडील , बांधतिवरे , साकुर्डे ,वेळवी , दहेण , भोमडी , मांदिवली आदी अनेक गावांकडे या मार्गावरुन जा ये करणारी वाहतूक धोक्याची झाली आहे.

आधीच  रस्त्यातील खड्डे बुजवून टाकण्यात चालढकल त्यात रस्त्याची बाजू ढासळण्याच्या प्रकाराची वेळीच सुधारणा करण्यास अपयशी ठरलेले  महाराष्ट्र शासनाचे  दापोली येथील बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत.
श्री.नरेंद्र करमरकर , तालूका सचिव , शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष दापोली