भाजपमधील अंतर्गत संघर्ष पोचला पोलिसात, मुनगंटीवार – जोरगेवार गटाच्या तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुरात भाजपमधील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मनपाची आज होणारी सर्वसाधारण सभा महापौरांनी स्थगित केल्याने याच पक्षातील एक गट अधिकच आक्रमक झाला. हा गट आमदार किशोर जोरगेवार यांचा समर्थक आहे. आज या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत एकत्र येत महापौरांना भेटण्याचा आणि त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण महापौरांनी भेट टाळली. महापौर संगीता खांडेकर या मुनगंटीवार गटाच्या मानल्या जातात. महापौर भेटीसाठी वेळ देत नसल्याने आमदार जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी केबिनबाहेर भजनाला सुरुवात केली. त्याचवेळी मुनगंटीवार गटाचे नगरसेवक तिथे पोचले. त्यामुळे एकाच पक्षातील या दोन गटात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

हे एवढ्यावरच थांबले नाही, तर एकमेकांना धक्काबुक्की केली. सत्ताधारी पक्षाच्या दोन गटात अशारितीचा गोंधळ नागरिकांनी पहिल्यांदाच बघितला. मागील काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. मनपात भाजपने सत्ता स्थापन केली असली, तरी पक्ष दोन गटात विभागला गेलाय. त्यामुळे नगरसेवकांतही गटबाजी आणि राजकीय टशन कायम आहे. याच राजकीय वैरातून आजची धक्काबुक्की झाल्याचे बोलले जाते. हा वाद इथेच संपला नाही, तर दोन्ही गटांनी पोलिस ठाणे गाठत एकमेकांची रीतसर तक्रार केली. भाजपमधील एखादा अंतर्गत वाद पोलिसांपर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संपूर्ण प्रकाराने भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.