पुरातत्व डायरी – वडनगर उत्खनन नागरी परंपरेचा पुरातत्वीय शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. आशुतोष पाटील 
[email protected]

भारताच्या दीर्घकालीन सांस्कृतिक सातत्याचे जिवंत पुरातत्वीय साक्षीदार म्हणून उभे असलेले वडनगर हे शहर त्याच्या उत्खननातील अभ्यासातून भारताच्या नागरी परंपरेचा हजारो वर्षांपूर्वीचा पुरातत्वीय संदर्भ दर्शवते.

भारतातील प्राचीन नगरांमध्ये गुजरात राज्यातील मेहसाणा जिह्यातील वडनगर हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुरातत्वीय स्थळ म्हणून ओळखले जाते. अनेक प्राचीन शहरे राजकीय उलथापालथ, पर्यावरणीय बदल किंवा आर्थिक ऱहासामुळे कालांतराने ओसाड झाली; परंतु वडनगर हे असे दुर्मिळ नगर आहे की, जिथे इ.स.पूर्व आठव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत मानवी वस्ती अखंडपणे टिकून असल्याचे पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेने गेल्या काही वर्षांत केलेल्या विस्तृत उत्खननामुळे या प्राचीन नगराच्या इतिहासाबाबत अनेक नवीन तथ्ये समोर आली आहेत. या संशोधनातून वडनगर हे केवळ एक प्राचीन नगर नसून भारतातील सर्वात प्राचीन अखंड वसाहतींपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे 2,750 वर्षांच्या सलग सांस्कृतिक थरांचा शोध लागल्यामुळे भारतीय नागरीकरणाचा विकास, धार्मिक परंपरा, कारागिरी, व्यापार व्यवस्था आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची मानवी क्षमता यांचा अभ्यास करण्यासाठी वडनगर अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

प्राचीन काळात वडनगरला आनंदपूर, अनर्तपूर, चमत्कारपूर, वृद्धनगर आणि नगर अशा विविध नावांनी ओळखले जात असे. स्कंदपुराण, मैत्रक राजांच्या ताम्रपटांमधील उल्लेख, चालुक्य (सोलंकी) राजा कुमारपालाच्या शिलालेखातील संदर्भ तसेच सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्यूएनसांग (Xuanzang) याच्या प्रवासवर्णनातून या नगराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. ह्यूएनसांगने वडनगरचे वर्णन समृद्ध, दाट लोकवस्ती असलेले आणि अनेक बौद्ध विहार तसेच हिंदू देवालयांनी नटलेले नगर असे केले आहे. विशेष म्हणजे, अलीकडील उत्खननातून प्राप्त झालेल्या पुराव्यांनी या ऐतिहासिक नोंदींची पुष्टी केली आहे.

वडनगर येथे पुरातत्वीय अवशेषांची प्रथम नोंद विसाव्या शतकाच्या मध्यात झाली. त्यानंतर 1954 मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांनी येथे प्रथम शास्त्राrय उत्खनन केले. या उत्खननाचा मुख्य उद्देश गुजरातमधील रेड पॉलिश्ड वेअर (Red Polished Ware) या मृद्भांड परंपरेची कालमर्यादा निश्चित करणे हा होता. या उत्खननातून इ.स. पहिल्या ते दहाव्या शतकादरम्यान येथे सातत्यपूर्ण मानवी वस्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दीर्घ कालावधीनंतर 2006 ते 2012 दरम्यान गुजरात राज्य पुरातत्व व संग्रहालय संचालनालयाने पुन्हा उत्खनन हाती घेतले. या मोहिमेचा प्रमुख उद्देश वडनगरमधील वारशाचा शोध घेणे हा होता. मात्र सर्वांत व्यापक आणि वैज्ञानिक उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने 2014 पासून 2022 पर्यंत विविध हंगामांमध्ये केले. सुमारे 3,200 चौरस मीटर क्षेत्रात केलेल्या या उत्खननात 24 मीटरपेक्षा अधिक जाडीचे सांस्कृतिक स्तर नोंदविण्यात आले. आधुनिक AMS (Accelerator Mass Spectrometry) रेडिओकार्बन डेटिंगच्या सहाय्याने येथे इ.स.पूर्व आठव्या शतकाच्या मध्यापासून मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे वडनगर हे भारतातील प्राचीन अखंडपणे वसलेले तटबंदीयुक्त नगर असल्याचे सिद्ध झाले आहे.

या उत्खननातील सर्वांत महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे वडनगरच्या सात सलग सांस्कृतिक कालखंडांची पुनर्रचना. प्रारंभीची वस्ती कोणत्याही संरक्षणव्यवस्थेशिवाय विकसित झाली होती. मात्र इ.स.पूर्व दुसऱया शतकात नगराभोवती मातीचा भव्य तट  उभारण्यात आला. गुजरातमध्ये ज्ञात असलेल्या सर्वांत प्राचीन संरक्षण व्यवस्थांपैकी हा एक मानला जातो.

उत्खननातून समोर आलेली नगररचना उल्लेखनीय आहे. उंच विटांच्या भिंती, आखीव-रेखीव निवासी घरे, अरुंद रस्ते आणि घरासमोरील ‘ओटा’सदृश बांधकाम यांमधून वडनगरच्या नागरिकांचे नियोजनबद्ध नागरी जीवन दिसून येते. विशेष म्हणजे, जुन्या घरांचे अवशेष पूर्णपणे हटविण्याऐवजी त्याच पायावर आणि त्याच रेषेत नवीन घरे बांधण्याची परंपरा अनेक शतकांपर्यंत कायम राहिली. त्यामुळे नगराचा विकास होत गेला. भारतीय पुरातत्व शास्त्रात इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत अशा प्रकारची सातत्यपूर्ण वास्तुशैली अत्यंत दुर्मिळ मानली जाते. वडनगर उत्खननातील सर्वांत महत्त्वाच्या शोधांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित वास्तू आणि पुरावशेषांना विशेष स्थान आहे. या उत्खननामुळे पश्चिम भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. तटबंदीच्या आतील भागात उत्खनन करताना मध्यभागी प्रशस्त अंगण आणि त्याभोवती भिक्षूंच्या निवासासाठी बांधलेल्या खोल्यांची सुबक मांडणी असलेला बौद्ध विहार (Buddhist Monastery) प्रकाशात आला. या विहारासोबतच विटांनी बांधलेले स्तूप, पूजेसाठी उभारलेले लहान स्तूप (Votive Stupas), बुद्धमूर्ती, बौद्ध मुद्रांक (Sealings), ब्राह्मी लिपीतील लेख, तसेच बौद्ध प्रतीकांनी अलंकृत मृद्भांडांचे तुकडे मोठ्या प्रमाणावर सापडले. या पुराव्यांवरून इ.स.च्या पहिल्या शतकापासून वडनगर हे बौद्ध धर्माचे एक प्रभावी केंद्र होते हे स्पष्ट होते. बुद्धाला मध अर्पण करणाऱया माकडाची जातककथा दर्शविणारा दगडी शिल्पफलक तसेच ब्राह्मी लिपीतील शिलालेख असलेले मुद्रांक या ठिकाणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देतात. सातव्या शतकात चिनी प्रवासी ह्यूएनसांगने वडनगरमध्ये अनेक बौद्ध विहार असल्याचा केलेला उल्लेख या उत्खननामुळे पुरातत्वीयदृष्ट्या सिद्ध झाला आहे.

आज वडनगर हे केवळ एक ऐतिहासिक नगर नाही, तर भारताच्या दीर्घकालीन सांस्कृतिक सातत्याचे जिवंत पुरातत्वीय साक्षीदार म्हणून उभे आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष आधुनिक नगराच्या पायाखाली सुरक्षित जतन झालेले आहेत.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)