इथेनॉलवरून पेट्रोल पेटले; नागरिकांमध्ये संभ्रम, सरकारकडून ‘ई-20’चे समर्थन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून देशभरात संभ्रमाची स्थिती आहे. इंजिन लवकर खराब होणे तसेच मायलेज घटणे अशा प्रकारच्या तक्रारी वाहनचालक करत आहेत. मात्र, सरकारने इथेनॉल मिसळण्याचे समर्थन केले आहे. सरकारने जगभरात वापरण्यात येणारे इथेनॉल मिश्रणाची पद्धत स्वीकारल्याचे म्हटले आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासंदर्भात दिल्लीत तज्ञांची पत्रकार परिषद झाली. त्यात सरकारच्या वतीने सहभागी झालेल्या वर्तिका शुक्ला यांनी सांगितले की, देशात 2013 आणि 2014 मध्ये 1.5 टक्के इथेनॉल मिसळण्यात येत होते. आता इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के करण्यात आले आहे. हे एका रात्रीत झालेले नाही. 2018 पासून याबाबत चर्चा करण्यात येत होती. सियाम आणि ऑटोमोटीव्ही रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियासारख्या संस्थांनी व्यापक चाचण्या केल्या आहेत. हिंदुस्थानने जगभरात वापरण्यात येणारी ही पद्धत स्वीकारली आहे, असे शुक्ला म्हणाल्या.

सरकारने ई-20 आणि ई-85 पेट्रोल लाँच केले. त्यामुळे वाहने खराब होत असल्याची ओरड देशभरातील वाहनचालक करत आहेत. इथेनॉल मिश्रण बंद करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

भूतानला हवे साधेच पेट्रोल

हिंदुस्थानचा शेजारी भूतानला इथेनॉल मिश्रित ई-20 पेट्रोल विकत घेण्यास नकार दिला आहे. हिंदुस्थानच्या बाजारपेठेत जोपर्यंत सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे, तोपर्यंत आम्हाला तेच पेट्रोल पुरवण्याची विनंती भूतानने केली आहे. भूतानमध्ये इंधन साठविण्याची यंत्रणा जुनी आहे. ई-20 पेट्रोलमुळे इंधनाच्या टाक्यांमध्ये गंज लागण्याची भीती आहे, असे भूतानने म्हटले आहे.

डिझेलमध्येही आयसोब्युटेनॉल मिसळण्याची तयारी

पेट्रोलमये इथेनॉल मिसळण्याप्रमाणेच आता डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याची योजना पेंद्र सरकारने आखली आहे. यासंदर्भात पेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून तयार झालेले आयसोब्युटेनॉल डिझेलमध्ये मिसळण्याची योजना आहे.