
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा खात्यामधील सफाई कामगार, मोटर लोडर व वाहनचालक या पदावर काम करणारे कामगार रस्त्यांची सफाई, कचरा एका ठिकाणी जमा करणे, गोळा केलेला कचरा मोटारीत भरणे, निवासी संकुलातील कचरा मोटारीत भरणे व तो डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेणे आणि तांत्रिक वाहनांच्या देखभालीचे काम वर्षभर आणि दिवसरात्र करीत आहेत. त्यामुळे पालिकेला परावलंबी बनवणारा आणि पालिकेची आर्थिक लूट करणारा घनकचरा कामाचा ठेका देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा ठेका रद्द करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
घनकचरा खात्याचे काम विनातक्रार व उत्तम सुरू आहे. असे असताना पालिका प्रशासनाने मे महिन्याच्या मध्यावर निविदा काढून ‘घनकचरा संकलन, परिवहन आणि निष्कासन’ हे काम खासगी ठेकेदाराकडून करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिकेने मान्यताप्राप्त 32 पैकी पाच संघटनांबरोबर 28 जुलै रोजी एका साध्या कागदावर करार केला आहे. हे काम ठेकेदाराला दिल्यास पालिकेला या कामासाठी सर्वस्वी ठेकेदारावर अवलंबून राहावे लागेल. याचे भविष्यात विपरीत परिणाम होतील, असे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने म्हटले आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष संजय बापेरकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
असा बसणार फटका
15 हजार कायम व कंत्राटी कामगारांना गरज नसलेल्या ठिकाणी काम दिले जाईल.
या कामासाठी होणारा वार्षिक 900 कोटींचा खर्च ठेकेदारीमुळे कित्येक कोटींनी वाढणार.
मोटर लोडर, पर्यवेक्षक, परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामाबाबत अनिश्चितता.
वारसाहक्क, पदोन्नती व त्यांना लागू असलेल्या सेवाशर्तींचा भंग होणार आहे.




























































