
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या आणि शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा आदेश जारी केला आहे.
हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने ५ जुलै रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, ६ जुलै रोजी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या ‘IMD नॅशनल फ्लॅश फ्लड गाईडन्स बुलेटिन’नुसारही सतर्कतेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सखल भागांत, तसेच नदी आणि खाडी किनारी पाणी साचून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या परिस्थितीच्या आढाव्यानंतर आपत्कालीन स्थिती विचारात घेऊन सुटीचा निर्णय घेण्यात आला आहे.































































