महिला कलाकारांना बॉलिवूडमध्ये गृहीत धरलं जातं… क्रिती सनॉनच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील लिंगभेदाचा मुद्दा चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री क्रिती सनाॅन हिने चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीत अजूनही पुरुष आणि महिला कलाकारांमध्ये वागणुकीत फरक केला जात असल्याचा दावा केला. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील लिंगभेदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लिली सिंग यांना दिलेल्या मुलाखतीत क्रितीने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात महिला कलाकारांसाठी संधी मर्यादित होत्या. आज परिस्थितीत काही प्रमाणात बदल झाला असला, तरी अनेक ठिकाणी महिलांकडे अजूनही वेगळ्या नजरेने पाहिले जाते.

क्रितीच्या मते, एखादी अभिनेत्री तिच्या भूमिकेबाबत किंवा दृश्यांबाबत दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना प्रश्न विचारत असेल, तर तिला जास्त बोलणारी किंवा खूप प्रश्न विचारणारी असा शिक्का लावला जातो. मात्र, हेच प्रश्न एखादा पुरुष कलाकार विचारत असेल, तर त्याला कामाबाबत जागरूक आणि व्यावसायिक समजले जाते. “माझ्यासोबतही असे अनुभव आले आहेत,” असे तिने सांगितले. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

 

तिने सेटवरील काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडेही लक्ष वेधले. पुरुष कलाकारांना अधिक चांगली व्हॅनिटी व्हॅन किंवा खोली दिली जाते, तर महिला कलाकारांना दुय्यम वागणूक मिळाल्याचे प्रसंग घडतात, असे ती म्हणाली. “मला अशा गोष्टींचा वैयक्तिक फरक पडत नाही, पण या वागणुकीतून महिलांना गृहीत धरले जाते, हे स्पष्ट दिसते,” असेही तिने नमूद केले. याशिवाय काही चित्रपटांच्या सेटवर महिला कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा आधी बोलावले जाते, मात्र त्यांच्या वेळेचा तितकासा आदर केला जात नाही, असेही क्रितीने सांगितले.