
सतत सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी 212.040 मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरणाची पूर्ण जलसाठा पातळी 214.000 मीटर असून, सध्या धरणात एकूण 282.60 दशलक्ष घनमीटर (72.83 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणातील उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा 149.60 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 58.67 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. वाढत्या पाणीसाठय़ामुळे धरणाचे 24 रेडियल दरवाजे प्रत्येकी 1.00 मीटरने उघडण्यात आले असून, त्याद्वारे 1,498 क्युसेक (52,902 क्युसेक) पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. कालव्याद्वारे 8.50 क्युसेक (300 क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. दिवसभरात 28 मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण पर्जन्यमान 76 मिमीपर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, तापी नदीपात्राजवळ अनावश्यक वावर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





























































