
बोगस कंपनीच्या नावाने विविध बँकांमध्ये करंट खाते खोलून ती खाती व सिमकार्ड सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेम्सच्या नावाने फसवणूक केलेली रक्कम वळती करण्यासाठी वापरण्याचा सुरू असलेला गोरखधंदा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. हा गैरकारभार करणाऱ्या गुजरातच्या पाच जणांना बेड्या ठोकत पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
मस्जिद बंदर येथील पार्श्व चेंबर्सच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत क्रं. 303मध्ये जी.डी. ओव्हरसीज या नावाने असलेल्या एका बोगस कंपनीचे ऑफिस आहे. ही कंपनी थाटलेल्यांनी शहरातील वेगवेगळय़ा बँकांमध्ये करंट खाती उघडली असून सिम कार्ड घेतली आहेत. ते सिम कार्ड व बँक अकांऊंट ऑक्टिव्ह करून सायबर गुन्हे व ऑनलाईन गेममध्ये फसवलेली रक्कम वळती करण्यासाठी दुबईतील भामटय़ांना पाठवली जात आहे, अशी खबर युनीट-2ला मिळाली. याची तत्काळ दखल घेत प्रभारी निरीक्षक दिलीप तेजनकर, निरीक्षक प्रशांत गावडे, उपनिरीक्षक शेख तसेच बोरसे, थिटमे, घरत, जाधव, सय्यद, आव्हाड, घाटोळ व शिंदे, कळसाने या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून टोळी प्रमुखासह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली.
आरोपींकडून 66 एटीएम कार्ड, दोन संगणक, कलर प्रिंटर, 12 सिम कार्ड, 15 पासबुक, 122 चेकबुक, 2 पेन ड्राइव्ह, विविध कंपन्यांचे 68 रबरी शिक्के, वीज बिले, विविध कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली.




























































