
‘राम हवा, मंदिर लुटणारे ‘हराम’ नको’, ‘मंदिरातले पैसे चोरतंय कोण? चेलेचपाटे आणि भामटे दोन’, ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, ‘सियावर प्रभू रामचंद्र की जय’, ‘पवनसुत हनुमान की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणा आणि डौलाने फडकणाऱ्या भगव्या झेंडय़ांमुळे दादरमध्ये आज अक्षरशः भगवे वादळच घोंगावले. हजारो शिवसैनिकांसह रामभक्तांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी होत अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटी लुटीचा धिक्कार केला. ‘देश लुटताय… आता देवाला तरी सोडा’, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. देवाच्या मंदिरातच दरोडा घालणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडू नका, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
शिवसेनेच्या ‘रामरक्षा’ आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, प्रभू रामभक्तांना मार्गदर्शन करताना मंदिरातील दानपेटी लुटणाऱ्यांना दिसतील तिथे जाब विचारण्याचे आवाहन केले. यावेळी ‘प्रभू रामचंद्र की जय’चा नारा घुमला. आंदोलनात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ऍड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, महेश सावंत, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, बाबी देव, ज्योती ठाकरे, नगरसेविका विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, नगरसेवक मिलिंद वैद्य, निशिकांत शिंदे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, रामभक्त नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

‘रामरक्षा’ आंदोलनाप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मारुतीची मनोभावे आरतीही केली. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
हिंदू माफ नही करेगा
शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनात लहान मुले आबालवृद्धांसह तरुणही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. हिंदू माफ नही करेगा अशा आशयाचे फलक झळकवून त्यांनी भाजपविरोधात आपला राग व्यक्त केला.
चोरी करून भाजपला काय मिळाले?
अयोध्येत भाजपचे सरकार असून राम मंदिरात चोरी करून काय मिळाले, असा सवाल उपस्थित करत आंदोलनात सहभागी झालेले घाटकोपर येथील 70 वर्षीय अशोक आटवे यांनी भाजपचा निषेध केला.
रामाच्या राज्यात लुटीचा निषेध
राम मंदिरातील लुटीचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही जनता एकवटली आहे. आम्हाला आमच्या राज्यात राम हवा मंदिर लुटणारे हराम नको अशा आषयाचे बॅनर झळकावत कांदिवलीच्या दिगंबर नारकर यांनी आपला रोष व्यक्त केला.

दादर कबुतरखान्याजवळील ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या शिवसेनेच्या या प्रचंड ‘रामरक्षा’ आंदोलनात भरपावसात प्रभू रामाचा जयजयकार आणि दानपेटी लुटारूंचा निषेध करीत आंदोलकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. डोक्यावर भगव्या टोप्या, गळ्यात भगवी उपरणी आणि हाती भगवा झेंडा घेऊन मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, रामभक्त आंदोलनात सहभागी झाले. परिसरात जागोजागी भगवे झेंडे झळकत होते. मंदिर परिसरात भगव्या पताकाही डौलाने फडकत होत्या.
देश लुटताय, देवाला तरी सोडा!
‘गली गली में शोर है, भाजप सरकार चोर है’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘जय श्रीराम’, ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष करीत शिवसैनिक रामभक्तांनी या वेळी गदा उंचावत दानपेटी लुटारूंना इशाराच दिला.
‘रामरक्षा’ आंदोलनात रामरक्षा स्तोत्र, महाआरती आणि हनुमान चालिसा पठण झाल्यानंतर आंदोलकांनी कपाळी रामनामाचा टिळा लावत प्रभू रामचंद्राचा जयघोष केला. या वेळी प्रसादाचे लाडू वाटपही करण्यात आले.

रामाच्या नावावर हे निवडून आलेले तिथेच चोरी करत आहेत. त्यांना त्यांच्या पापाचे फळ नक्कीच मिळेल, अशी प्रतिक्रिया घाटकोपरच्या सुरेश लाड आणि शांताराम निकम यांनी दिली.

महालक्ष्मीच्या 67 वर्षीय रंजना जाधव आंदोलनात सहभागी झाल्या. भाजप सरकार चोर असून उद्धव साहेबांनी केलेले आंदोलन योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले.
विलेपार्लेच्या राधिका शर्मा यांनी हनुमान चालिसा उंचावून आपला निषेध नोंदवला. या चोरांना शिक्षा व्हायलाच हवी, असे त्या म्हणाल्या.

चेंबूरच्या वनीता बोरगे यांनी निषेध दर्शवण्यासाठी ‘मंदिरातले पैसे चोरतंय कोण? चेलेचपाटे आणि भामटे दोन’ असा फलक झळकावला.

शिवसेनेच्या आंदोलनात वरळीतील मुस्लीम महिला भगिनी रुबी शेख यांनी सहभागी होत दानपेटी लुटीबद्दल संताप व्यक्त केला.
राम नाम जपना, जनता का माल अपना

अयोध्येतील राम मंदिरात चौकीदारानेच चोरी केल्याचे व्यंगचित्र झळकावत आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच टोला लगावला. ‘राम नाम जपना, जनता का माल अपना’ असा आशय लिहून पुजारी आणि ढोंगी हिंदुत्ववादी दानपेटी चोरून नेत असल्याचे दाखवण्यात आले होते.
चिमुकल्या रेवाचाही आंदोलनात सहभाग

दादरच्या वटवृक्ष हनुमान मंदिराजवळ शिवसेनेने पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनात चिमुकल्यांनीही सहभाग नोंदवला होता. रामरक्षा व मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी माटुंगा येथे राहणारी सहा वर्षांची रेवा गुंडाळ सहभागी झाली होती. तिच्या सोबत मधुमती गुंडाळ आणि वंदना अहिरे उपस्थित होते. दानपेटी लुटणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया चिमुकलीच्या पालकांनी दिली.

‘गली गली में शोर है, भाजप सरकार चोर है’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा घोषणा शिवसैनिक रामभक्तांनी दिल्या. रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा आणि महाआरतीप्रसंगी भरपावसात प्रभू रामाला हात जोडून दानपेटीच्या लुटारूंना धडा शिकवा अशी विनवणीच केली.
आंदोलनाचा शंख फुंकला

शिवसेनेच्या ‘रामरक्षा’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महंतांनी शंखनाद करीत प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील दानपेटी लुटीविरोधात शंखनाद केला.
स्त्री शक्तीचा संताप

आंदोलनादरम्यान मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असताना मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेच्या महिला रणरागिणीही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. भगव्या साडय़ा, भगव्या टोप्या घालून शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. वरळीतील महिला शिवसैनिकही या वेळी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या.
भाजप–भारतीय चंदाचोर पार्टी

आंदोलनात झळकवण्यात आलेले ‘भाजप’ म्हणजे ‘भारतीय चंदाचोर पार्टी’ अशा फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भगवे आमचे रक्त, आम्ही रामभक्त

आंदोलकांनी ‘भगवे आमचे रक्त, अन्यायावर वार करणारे आम्ही रामभक्त’ असे फलक झळकावले.



























































