लेख – हायब्रिड लर्निंगची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. जयदेवी पवार

तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या नवकल्पनांमुळे ज्ञान मिळवण्याच्या आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आजचे शैक्षणिक जग अशा वळणावर उभे आहे. विद्यार्थ्यांसमोर वर्षानुवर्षे चालत आलेली वर्गखोलीतील शिक्षण पद्धती आणि आधुनिक डिजिटल शिक्षण मंच हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास हेच असले तरी त्यांची कार्यपद्धती, परिणामकारकता आणि मर्यादा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहण्याऐवजी शिक्षणाच्या विविध गरजांची पूर्तता करणारी पूरक साधने म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.

गेल्या काही वर्षांत भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडून आले आहेत. एकेकाळी एखाद्या शाळेची गुणवत्ता तिच्या इमारती, शिक्षक आणि परीक्षेतील निकालांवर मोजली जात होती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. एखादी शाळा किंवा महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर करते, हादेखील गुणवत्तेचा महत्त्वाचा निकष बनला आहे. गृहपाठ मोबाईल ऍपवर मिळणे, ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणे, डिजिटल स्वरूपातील अभ्यास सामग्री वापरणे आणि शिक्षकांशी आभासी माध्यमातून संवाद साधणे हे आता अनेक विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे.

त्यामुळे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता अधिक व्यापक आणि सुलभ झाले आहे.  वर्गखोलीतील शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष संवाद. विद्यार्थ्यांना तत्काळ प्रश्न विचारण्याची, जटिल विषयांवर चर्चा करण्याची आणि शिक्षकांकडून लगेच मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळते. शाळा आणि महाविद्यालयांमधील निश्चित वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन आणि नियमित अभ्यासाची सवय निर्माण करते. याशिवाय सहअध्यायींशी सातत्याने होणारा संपर्क विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, संघ भावना आणि प्रभावी संवाद कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. समूहात काम करणे, परस्पर संबंध निर्माण करणे आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही कौशल्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक पात्रतेइतकीच महत्त्वाची ठरतात.

पारंपरिक शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यातून मिळणारा प्रत्यक्ष अनुभव. विज्ञान प्रयोगशाळा, तांत्रिक कार्यशाळा, क्रीडांगणे आणि विविध प्रात्यक्षिक उपक्रम विद्यार्थ्यांना असे ज्ञान देतात, जे केवळ स्क्रीनवरून आत्मसात करणे कठीण असते. भौतिक वातावरणामुळे लक्ष विचलित करणारे घटक कमी होतात आणि अभ्यासात एकाग्रता वाढण्यास मदत होते. तथापि, या शिक्षण पद्धतीच्या काही मर्यादाही आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होतो. भौगोलिक स्थानानुसार शिक्षणाच्या गुणवत्तेतही मोठी तफावत दिसून येते. तसेच निश्चित वेळापत्रकामुळे नोकरी, व्यवसाय किंवा इतर वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींना शिक्षण घेणे अनेकदा आव्हानात्मक ठरते.

याच मर्यादांवर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण एक क्रांतिकारी पर्याय म्हणून उदयास आले आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षणाला भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत. आज एखादा विद्यार्थी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून उत्कृष्ट दर्जाचे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साधने वापरू शकतो. ऑनलाइन शिक्षणाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची लवचिकता. विद्यार्थी आपल्या करीअर, कुटुंब आणि शिक्षण यांच्यात समतोल साधत शिक्षण घेऊ शकतात. आर्थिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे नियमित शैक्षणिक संस्थांमध्ये जाणे शक्य नसलेल्या लाखो लोकांसाठी या माध्यमाने नव्या संधी निर्माण केल्या आहेत.

आज विविध डिजिटल मंचांवर जगभरातील तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन प्राप्त होतो आणि नव्या कौशल्यांचे शिक्षण घेण्याची संधी मिळते. ऑनलाइन शिक्षणाची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे वैयक्तिक गतीने शिकण्याची मुभा. विद्यार्थी रेकॉर्ड केलेली व्याख्याने पुनः पुन्हा पाहू शकतात, कठीण विषयांवर अधिक वेळ देऊ शकतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अभ्यास करू शकतात. मल्टिमीडिया साधने, दृश्य माध्यमे आणि परस्पर संवादी तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक आणि समजण्यास सोपी बनते.

मात्र, डिजिटल शिक्षणही पूर्णपणे दोषमुक्त नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रत्यक्ष मानवी संवादाचा अभाव. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वर्गखोलीतील सामाजिक अनुभवाची जागा पूर्णपणे घेणे त्याला शक्य होत नाही. ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उच्च स्तरावरील आत्मशिस्त, स्वप्रेरणा आणि वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचबरोबर इंटरनेटची उपलब्धता, संगणक किंवा स्मार्ट उपकरणांची कमतरता आणि तांत्रिक अडचणी शिक्षणाच्या मार्गातील मोठे अडथळे ठरू शकतात. विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा तांत्रिक क्षेत्रांसारख्या प्रात्यक्षिक प्रशिक्षण आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमांसाठी केवळ ऑनलाइन शिक्षण पुरेसे ठरत नाही.

या दोन्ही शिक्षण पद्धतींच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्यांची परिणामकारकता विद्यार्थ्यांच्या गरजा, परिस्थिती आणि विषयाच्या स्वरूपावर अवलंबून असते. ज्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण आवश्यक असते, तेथे पारंपरिक वर्गखोलीतील शिक्षण अनिवार्य ठरते. दुसरीकडे, करीअरमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी किंवा वेळेच्या मर्यादा असलेल्या व्यक्तींसाठी ऑनलाइन शिक्षण अधिक उपयुक्त ठरते. आजच्या बदलत्या काळात शिक्षणाचे भविष्य मिश्रित किंवा हायब्रिड शिक्षण पद्धतीमध्ये दडलेले दिसते. जगातील अनेक आघाडीच्या शैक्षणिक संस्था वर्गखोलीतील शिक्षणाची परिणामकारकता आणि डिजिटल साधनांची सोय यांचा समन्वय साधत आहेत. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची लवचिकता मिळते, तसेच प्रत्यक्ष संवाद, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचाही लाभ मिळतो. शिक्षण क्षेत्रातील ही नव्या युगाची दिशा अधिक समावेशक, परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित मानली जाते. शेवटी, ‘पारंपरिक आणि ऑनलाइन शिक्षण यांपैकी कोणते श्रेष्ठ?’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा दोन्हींच्या सामर्थ्यांचा योग्य उपयोग कसा करता येईल, यावर भर देणे अधिक आवश्यक आहे. या दोन्ही माध्यमांचा संतुलित समन्वय साधला तर अधिक व्यापक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्था उभारता येईल. अशा शिक्षण पद्धतीमुळे पुढील पिढी बदलत्या जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासही सक्षम बनेल.