
हिंदुस्थानी नौदलाच्या सामर्थ्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे. प्रोजेक्ट १७-ए अंतर्गत स्वदेशी बनावटीची सातवी आणि शेवटची स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका महेंद्रगिरी येत्या ११ जुलै रोजी हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील होणार आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
‘महेंद्रगिरी’ ही युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे बांधण्यात आली असून, तिच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने स्वदेशी तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या युद्धनौकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे स्टेल्थ तंत्रज्ञान आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे ही नौका शत्रूच्या रडारला सहज चकवा देऊ शकते. तसेच शत्रूवर अचूक मारा करण्यासाठी ती अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज आहे. ओडिशा राज्यातील पूर्व घाटात असलेल्या महेंद्रगिरी या पर्वत शिखराच्या नावावरून या अत्याधुनिक युद्धनौकेला हे नाव देण्यात आले आहे.
प्रोजेक्ट १७-ए अंतर्गत नौदलासाठी एकूण सात प्रगत युद्धनौका बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी चार युद्धनौका माझगाव डॉकमध्ये तर उर्वरित तीन गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स येथे बांधण्यात आल्या आहेत. महेंद्रगिरी ही या मालिकेतील सातवी आणि अंतिम युद्धनौका असल्याने ११ जुलैचा दिवस हिंदुस्थानी नौदलासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.


























































