Ratnagiri News -संगमेश्वर तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग; पावसानंतर बळीराजा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. सुरुवातीला भाताची रोपे रुजल्यानंतर पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लावणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील लोवले, शिवणे, माभळे, कुरधुंडा, बुरंबी, कोळंबे, कसबा, गोळवली आदी गावांमध्ये सध्या भात लावणीची लगबग सुरू आहे. शेतांमध्ये महिला व पुरुष शेतमजुरांची मोठी गर्दी दिसून येत असून पारंपरिक पद्धतीने लावणीची कामे सुरू आहेत. संगमेश्वर तालुका हा भात शेतीसाठी ओळखला जात असल्याने सध्या बहुतांश शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदा भात पिकाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित गावांमध्येही लवकरच भात लावणीची कामे पूर्ण होतील, असा विश्वास कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.