
एमएमआरडीए क्षेत्रासह राज्याच्या काही भागांत आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांनी आज भाव खाल्ला. शिल्लक राहिलेल्या भाज्या जवळपास ३० ते ४० टक्के चढ्या दराने विकल्या. शनिवारी पावसाची दिवसभर संततधार असल्यामुळे ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे सुमारे ४० टक्के भाजीपाला मार्केटमध्ये शिल्लक राहिला होता. आज मार्केटला सुट्टी असूनही हा शिल्लक भाजीपाला हातोहात चढ्या दराने विकला गेला. शनिवारी १० ते १२ रुपये किला दराने विकल्या गेलेल्या कोबीसाठी ग्राहकांना आज २० ते २२ रुपये मोजावे लागले. काकडी, भेंडी आणि फ्लॉवरच्या दरातही चांगली वाढ झाली.
मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असला तरी राज्याच्या अन्य भागांत अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. शनिवारीही मोठ्या प्रमाणात भाजीपाला मार्केटमध्ये आला. मात्र पावसाची संततधार दिवसभर सुरू असल्याने मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, भाईंदर येथील ग्राहक एपीएमसी मार्केटमध्ये आलेच नाही. परिणामी व्यापाऱ्यांवर मालाची राखण करण्याची वेळ आली. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले. काकडी पाच ते सहा रुपये, टोमॅटो ३० ते ३२ रुपये, कोबी १२ ते १४ आणि भेंडी २० ते २१ रुपये किलो या दराने विकली गेली. सुमारे ४० टक्के माल मार्केटमध्ये शिल्लक राहिला.
शिल्लक मालावर ग्राहकांच्या उड्या
शनिवारच्या तुलनेत आज मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर थोडा कमी झाला. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये शिल्लक असलेल्या फळभाज्यांवर आज ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. शिल्लक माल शनिवारच्या तुलनेत चढ्या दराने विकला गेला. काकडीचा दर दुप्पट झाला तर भेंडी ३० ते ३२ रुपये किलो या दराने विकली गेली. रविवार असल्यामुळे आज मार्केटला सुट्टी होती. मात्र सुट्टीच्या दिवशीही शिल्लक भाजीपाला चढ्या दाराने विकला गेल्याने व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे टेन्शन कमी झाले.
बाजारभाव वाढणार
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सध्या राज्यातील भाजीपाल्याबरोबर परराज्यांतील भाजीपाल्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्याच्या विविध भागांत आता पाऊस सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर येत्या काही दिवसांत जाणवणार आहे. त्यामुळे शेतमालाचा बाजारभाव वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजीपाला मार्केटमधील व्यापारी शंकर फडतरे यांनी व्यक्त केली आहे.
किरकोळ बाजारात चढेच दर
पावसामुळे एपीएमसीच्या ठोक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात मात्र सर्वच भाज्या चढ्या दराने विकल्या गेल्या. टोमॅटो ५० ते ७० रुपये, भेंडी ६० ते ७० रुपये, काकडी ३० ते ४० रुपये किलो या दराने ग्राहकांना खरेदी करावी लागली. कोथिंबिरीसह अन्य पालेभाज्या किरकोळ बाजारात चढ्या दराने विकल्या गेल्या. पालभाज्यांचे दर ठोक बाजारात १० ते १५ रुपये जुडीपर्यंत आले आहेत.
































































