
म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने प्रायोगिक तत्त्वावर उपनगरात 25 ठिकाणी कंटेनर अंगणवाडी बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुठे जागा मिळण्यास तर पुठे एनओसी मिळण्यास अडचण आदी कारणांमुळे गेल्या तीन वर्षांत केवळ 15 ठिकाणी अंगणवाडय़ा सुरू झाल्या असून दहा अंगणवाडीचे काम अद्याप रखडल्याचे समोर आले आहे.
म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सातत्याने झोपडपट्टीत वेगवेगळी कामे हाती घेतली जातात. मुंबई उपनगरातील झोपडपट्टीत असलेले अंगणवाडी वर्ग पुठे समाज मंदिरात, तर पुठे झोपडीत भरवावे लागतात. त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी सुधार मंडळाने 25 कंटेनर अंगणवाडी उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, आतापर्यंत कांदिवली, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, पुर्ला, मालाड, माटुंगा आणि घाटकोपर अशा ठिकाणी मिळून 15 ठिकाणी कंटेनर अंगणवाडी उभारणे शक्य झाले आहे. जागा उपलब्ध नसणे किंवा काही ठिकाणी एनओसी मिळूनही संबंधित जागेवर कंटेनर घेऊन जाण्यासाठी येणारी अडचण आदी कारणांमुळे 10 ठिकाणी कंटेनर अंगणवाडी उभारणे अद्याप शक्य झाले नसल्याचे झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान ज्या 10 कंटेनर अंगणवाडी अद्याप उभारल्या नाहीत त्याचा निधी शिल्लक असल्यामुळे मुंबई शहरात काही ठिकाणी कंटेनर अंगणवाडी उभारता येतील का याबाबत चाचपणी केली जात आहे.






























































