
कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कोस्टल रोडला पुन्हा एकदा गळती लागल्याचे समोर आले. बोगद्यातील काही सांध्यांमधून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी झिरपू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने रविवारी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, या गळतीची माहिती मिळताच पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गळतीची पाहणी करून दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. गळतीला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुमारे 14 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा सागरी किनारा मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. 12 मार्च 2024 रोजी वरळी येथील बिंदुमाधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्ह या नऊ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रियदर्शिनी पार्क ते मरीन ड्राइव्हदरम्यानचा 2.07 किलोमीटर लांबीचा बोगदा सुरू झाल्याने वरळी ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांत करणे शक्य झाले. मात्र हा बोगदा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच गळतीची समस्या समोर आली होती.





























































