
मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
घटनेनंतर पोलीस, महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व रस्ता साफसफाईचे काम सुरू केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. गेले दहा तासांहून अधिक काळ मुंबई – गोवा महामार्ग ठप्प असून दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच महामार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात दुसऱ्या घटनेत विन्हेरे येथे झाडे पडल्याने मार्ग बंद झाला असून मोठा डोंगर रस्त्यावर आला आहे. हा मार्ग सुध्दा मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





























































