मीरा रोडमध्ये पावसाच्या पाण्यावरून दोन गटांत राडा; भररस्त्यात कोयता काढल्याने घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या कारणावरून मीरा रोडमधील पेणकरपाडा परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान एका व्यक्तीने भररस्त्यात हातात कोयता घेऊन दहशत माजवली.

मीरा रोडमधील पेणकर पाडा परिसरात राहणारे एक कुटंब मुसळधार पावसामुळे घरावर प्लास्टिक टाकण्याचे काम करत होते. मात्र त्यामुळे पावसाचे पाणी शेजारील घराच्या दिशेने वाहत होते. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळादरम्यान प्लास्टिक कापण्यासाठी आणलेला कोयता एका व्यक्तीने हातात घेतला. भररस्त्यात धारदार शस्त्र पाहताच परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा कौटुंबिक वाद असून एका व्यक्तीने प्लास्टिक कापण्यासाठी कोयता हातात घेतला होता. दोन्ही बाजूंनी आपापसातील वाद मिटवला असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून दोन्ही कुटुंबांना समज देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.