
पॅराग्वेने नव्वद मिनिटांसाठी किल्ला बांधला होता. किलियन एम्बाप्पेला रोखण्यासाठी पहारेकरी उभे केले होते आणि फ्रान्सच्या प्रत्येक हल्ल्यासमोर पाच बचावपटूंची पोलादी भिंत रचली होती, पण तोफ कितीही वेळ शांत राहिली तरी तिचा एक गोळा युद्धाचा निकाल बदलण्यासाठी पुरेसा असतो. 70 व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनल्टीवर असाच निर्णायक ‘बॉम्ब’ फेकला आणि पॅराग्वेचा किल्ला 1-0 असा उद्ध्वस्त करत फ्रान्सने वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ते सलग चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. आता त्यांच्यासमोर मोरोक्कोचे आव्हान असेल.
सामन्याच्या प्रारंभापासून चेंडूवर फ्रान्सची सत्ता होती, पण गोलच्या दारावर पॅराग्वेने अक्षरशः कुलूप ठोकले होते. जागतिक क्रमवारीत 41व्या स्थानावर असलेल्या पॅराग्वेने पाच बचावपटूंची भक्कम तटबंदी उभारत फ्रेंच आक्रमणाची धार बोथट केली. मॅन्यू कोनेचे दोन प्रयत्न वाया गेले, मायकेल ओलिसच्या कल्पकतेला जागा मिळाली नाही आणि उस्मान डेम्बेलेलाही अपेक्षित स्फोट घडवता आला नाही. फ्रान्स चेंडू फिरवत होता, पॅराग्वे भिंत घट्ट करत होता आणि वेळ फ्रेंचांच्या संयमावर हातोडे मारत पुढे सरकत होती.
मात्र प्रशिक्षक दिदिएर देशाँ यांनी दुसऱ्या सत्रात डिझायर डुएला मैदानात उतरवले आणि ही चाल बुद्धिबळातील ‘चेक’ ठरली. डुएने वेग, चपळाई आणि थेट घुसखोरीने पॅराग्वेच्या बचावाला हादरे दिले. अखेर 70 व्या मिनिटाला त्याला पाडण्यात आले आणि फ्रान्सला पेनल्टी बहाल झाली. पुढे एम्बाप्पे होता, समोर गोलरक्षक आणि मागे कोट्यावधी फ्रेंच चाहत्यांचा श्वास अडकलेला. पण एम्बाप्पेच्या पायात भीती नव्हती. त्याने धावण्याची लय बदलली, गोलरक्षकाचे गणित चुकवले आणि चेंडू जाळ्यात धाडला. एक फटका, एक गोल आणि
पॅराग्वेच्या नव्वद मिनिटांच्या स्वप्नांना सुरुंग लागला.
पॅराग्वेने मात्र फुटबॉलसोबत शरीरबळाचीही भाषा वापरली. आंद्रेस क्युबासने एम्बाप्पेला खाली घेतल्यानंतर वातावरण तापले आणि दोन्ही संघांचे खेळाडू आमनेसामने आले. माटियास गालार्झानेही एम्बाप्पेला चिथावण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्की, बाचाबाची आणि वारंवार होणाऱ्या कठोर टॅकल्समुळे फ्रेंच कर्णधाराच्या संयमाची परीक्षा झाली.
38 अंश सेल्सिअसच्या उकाड्यात, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवी वातावरणात आणि 68 हजार 324 प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत फ्रान्सने सौंदर्यापेक्षा संघर्षाची निवड केली. देशाँ यांच्या संघाने दाखवले की, विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक वेळी व्हायोलिन वाजवावे लागत नाही; कधी कधी रणशिंग फुंपून, दात-ओठ खाऊन आणि एका अचूक वारावरही युद्ध जिंकावे लागते.
एम्बाप्पेने मेस्सीला गाठले!
या एका गोलाने मात्र सामन्यापलीकडचे वादळ उठवले आहे. एम्बाप्पेचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील सातवा गोल ठरला आणि ‘सुवर्ण बुटा’च्या शर्यतीत त्याने लिओनेल मेस्सीशी बरोबरी साधली. आता दोघेही सात-सात गोलांवर आहेत. पण खरी थरारक शर्यत दुसरी आहे. एम्बाप्पेच्या वर्ल्ड कप कारकीर्दीत आता 19 सामन्यांत 19 गोल झाले आहेत, तर मेस्सी 20 गोलांवर आहे. तो आता मेस्सीच्या ‘20’ मागे लागला आहे. पॅराग्वेविरुद्धचा गोल हा फक्त विजयाचा गोल नव्हता. तो मेस्सीच्या विक्रमाच्या दारावर झाडलेला एकोणीसावा गोळा होता.































































