
मिसिंग लिंक कोसळल्याची घटना, मानखुर्दमधील दुर्घटना आणि पावसात मुंबई आणि महाराष्ट्राची झालेली दूरवस्था याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या दुरवस्थेला भाजपचे राजकारण आणि विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार टोकाला गेला आहे, असा घणाघात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावी म्हणजे त्यांना कळेल. शहराची काय दैना झाली आहे. मुंबई सध्या भाजपच्या ताब्यात आहे. ते विकासाचा फार गाजावाजा करतात पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय, हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची काय अवस्था झाली आहे, ते पाहावे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच आश्चर्य वाटतं की, शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय. ते म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत आणि ड्युराबिलिटी चेक करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन पहावं काय अवस्था आहे. पूर्ण मिसिंग लिंक कोसळला आहे. खड्ड्यांचा विषय सोडून द्या, पूर्ण मिसिंग लिंक धोधो कोसळला आहे. त्याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकरी आहे. आपलं कोण काय वाकड करणार? कोण का उखडणार? आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35 टक्के आधीच घेतले आहेत. आपापल्या ठेकेदारांना काम दिलेली आहेत. त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
मिसिंग लिंक ज्याचं तुम्ही ढोल वाजवत कौतुक केलंत, विकास काय आहे वगैरे दाखवलं, आता तुम्ही जाऊन विकास पहा. मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या, एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्याने डेप्युटी सिएम आजारी पडले. एवढे त्यांना विकासाच अजीर्ण झालं आहे. या विकासाच्या अजिर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
संपूर्ण मुंबई तुंबली आहे. दुर्घटनेत सहा माणसं मानखुर्दला मेली आहेत. तिथे माणसं मेली आणि हे एका बिल्डरच्या घरी बारशाला गेले होते. लोकांचा आक्रोश सुरू आहे आणि तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिदीफिदी हसतायत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेल आहे. अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवली आहे. दुसऱ्या डेप्युटी सीएमबाबत बोलण्याच काही कारणच नाही. त्यांना काय कळतच नाही.
साडेचार वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. साडेचार वर्ष हा मोठा काळ आहे. साडेचार वर्षांमध्ये त्यांनी काय केलं? हे मुंबईत दिसतंय. मिठी नदीत दिसतंय. मिठी नदीचा जो घोटाळा सध्या सुरू आहे. त्यातले लाभार्थी कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत. त्याच्यामध्ये गौतम आडाणीलाही मोठं काम मिळालेल आहे. मिठी नदी जी काय आता कुर्ल्यामध्ये घुसली आहे. पूर्ण मुंबईत घुसू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
आमचे 25 वर्षांचं सोडा, साडेचार वर्षात तुम्ही काय केले ते सांगा. महापालिका साडेचार वर्षात लुटली तुम्ही. ठेकेदारांच राज्य आणलं. मुंबईची काय दैना करून ठेवली आहे. जाऊन पहा मिस मिसिंग काय दैना आहे जाऊन पहा. सगळे रस्ते मुंबईचे कसे वाहून गेले. जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो त्यांच्याकड तुम्ही काय अपेक्षा करता? असा सवालही त्यांनी केला.
या सगळ्याच्यामध्ये सगळे बांगलादेशी हटाव, बांगलादेशी हटाव, हे महापालिकेचं काम आहे का? जबाबदारी कोणाची आहे जबाबदारी ज्यांच राज्य आहे भारतीय जनता पक्षाचे त्यांची आहे. स्टॅडिंग कमिटी चेअरमन असेल महापौर असतील त्यांचे इतर पदाधिकारी जे महापालिकेत पैसे गोळा करतायत, ही त्यांची जबाबदारी आहे तुम्ही अधिकाऱ्यांचे बळी कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.





























































